कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द कराव्या; रामदास आठवले यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 01:41 PM2021-04-07T13:41:53+5:302021-04-07T13:43:01+5:30
Coronavirus : देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत आहे. यापूर्वी राज ठाकरे यांनीदेखील केली होती मागणी
"महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढत आहे. दररोज कोरोनाबाधित रुग्णसंख्या हजारोच्या संख्येने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा घेणे हा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ ठरू शकेल. त्यामुळे राज्यात दहावी आणि बारावी च्या बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्यात," अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
"महाराष्ट्रच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून त्यांना पुढील वर्गात प्रमोट करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आणि स्वागतार्ह आहे. त्या प्रमाणेच १० वी आणि १२ वी च्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करून या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात वर्गोन्नती द्यावी," अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
राज ठाकरेंनीही केली होती मागणी
"राज्यातील शाळा बंद आहेत, पण शाळांकडून फी आकारणी सुरूच आहे. एक तर विद्यार्थ्यांचं वर्ष वाया गेलंय. आता दहावी बारावीच्या परीक्षा होत आहेत, पण या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना प्रमोट करायला हवं. कारण, ते कोणत्या मानसिकतेत असतील हे सांगता येत नाही, ते लहान आहेत. त्यांच्या मानसिकतेचा विचार व्हायरला हवा. पहिल्यांदाच आपल्यावर हा प्रसंग ओढवलाय. त्यामुळे, मी राज्य सरकारला विनंती करत आहे की, खालच्या विद्यार्थ्यांना जसं प्रमोट केलंय, तसं दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनाही पुढे ढकलावं," असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेदरम्यान म्हटलं होतं.