मंत्री सदाभाऊ खोत यांनी दादर मार्केटमध्ये विकली भाजी
By admin | Published: July 12, 2016 11:57 AM2016-07-12T11:57:24+5:302016-07-12T12:02:53+5:30
महाराष्ट्राचे कृषी व पणन मंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतक-यांच्या बाजूने उभे राहत दादर मार्केटमध्ये स्वत: भाजी विकली.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - शेतकऱ्यांकडून वसूल केली जाणारी आडत आता व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांचा संप सुरू असतानाच महाराष्ट्राचे कृषी व पणन मंत्री सदाभाऊ खोत मात्र शेतक-यांच्या बाजूने उभे असलेले दिसत आहेत. मंगळवारी पहाटे सदाभाऊ खोत यांनी दादरच्या प्लाझा भाजीपाला मार्केटमधअये जाऊन स्वत: भाजी विकली.
पहाटे पाच वाजता मार्केटमध्ये आलेल्या खोत यांनी जुन्नरवरून १० टेम्पो घेऊन आलेल्या श्रीराम गाढवे या शेतक-याला भाजीपाल विकण्यासाठी स्वत: मदत केली. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका मंत्र्याने दादर भाजीपाला मार्केटमध्ये जावुन शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी भाजी विकल्याची घटना घडली असून या कृतीद्वारे त्यांनी शेतक-यांना सरकार सदैव तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाहीच दिली.
ना. सदाभाऊ खोत स्वत: विविध बाजारात भाजी मंडईत गेले व तेथे आलेल्या हिंदुराव शिळीमकर, राजेंद्र पवळे, रिंगे बुवा अशा महाराष्ट्राच्या विविध भागातुन आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीची चौकशी केली. तसेच येथे येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यास आपण सहकार्य करू व संरक्षणही देऊ, असे आश्वासनही खोत यांनी दिले.