मंत्री साहेब, खरोखरच ‘अच्छे दिन’ येतील का?

By admin | Published: June 27, 2014 12:44 AM2014-06-27T00:44:36+5:302014-06-27T00:44:36+5:30

वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे २०१३ पासून संपलेले दरकरार, यामुळे पडलेला औषधांचा तुटवडा, कंत्राटी पद्धतीमुळे डॉक्टरांची थांबलेली पदोन्नती, अपुऱ्या डॉक्टर्समुळे तातडीचे आॅपरेशन

Minister Saheb, will there really be a "good day"? | मंत्री साहेब, खरोखरच ‘अच्छे दिन’ येतील का?

मंत्री साहेब, खरोखरच ‘अच्छे दिन’ येतील का?

Next

मेयो, मेडिकलची स्थिती बिकट : वैद्यकीय शिक्षण मंत्री नागपुरात दाखल
नागपूर : वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे २०१३ पासून संपलेले दरकरार, यामुळे पडलेला औषधांचा तुटवडा, कंत्राटी पद्धतीमुळे डॉक्टरांची थांबलेली पदोन्नती, अपुऱ्या डॉक्टर्समुळे तातडीचे आॅपरेशन करायलादेखील लागत असलेला आठवड्याचा अवधी, सफाई कर्मचाऱ्यांच्या तोकड्या संख्येमुळे स्वच्छतेचा अभाव, नर्सिंगसाठीच्या सुविधा, साधने यांची भीषण कमतरता यामुळे मेयो, मेडिकलची स्थिती बिकट झालेली आहे.
उद्या शुक्रवारी नवे वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड या दोन्ही रुग्णालयांना भेटी देणार आहेत. तेव्हा ‘अच्छे दिन’ येतील का, असा प्रश्न सर्वसामान्यांनी विचारला आहे. गुरुवारी सायंकाळी आव्हाड नागपुरात दाखल झाले. दरम्यान, त्यांनी दीक्षाभूमीला भेट देऊन दर्शन घेतले.
मेयोची स्थिती वाईटच
ब्रिटिशांच्या काळातील असलेले इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आज खंबीर नेतृत्वामुळे सुधारत असले तरी स्थिती वाईटच आहे. रुग्णालयाचा परिसर हा ३८.२६ एकर जमिनीवर पसरलेला आहे. बहुतांशी इमारती या जुन्या व विखुरलेल्या आहेत. काही इमारतींचे वय तर १८८ पर्यंत गेले आहे. त्यामुळे रुग्णसेवेमध्ये सुलभता व गुणात्मकता बाधित होत आहे. यातच शिक्षकांच्या १४ जागा, तंत्रज्ञ ८, लिपिकांच्या २५, परिचारिकांच्या ११० तर सफाई कर्मचाऱ्यांच्या १०९ जागा रिक्त आहेत. शासनाच्या दरपत्रकावर अनेक महत्त्वाची औषधे नाहीत. अधिष्ठाता स्थानिक पातळीवर औषधांची खरेदी करीत असले तरी त्यांनाही मर्यादा पडतात. यामुळे रुग्णांना पदरमोड करून बाहेरून औषध आणावे लागत असल्याचे चित्र आहे. याशिवाय सुरक्षा भिंतीच्या अभावामुळे रुग्णापासून ते डॉक्टर येथे स्वत:ला असुरक्षित समजतात.
मेडिकलमध्ये उपचाराची प्रतीक्षाच
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) प्रत्येक रुग्णाला हव्या त्या सोयी मिळविण्यासाठी संघर्षच करावा लागतो. येथील लेक्चरर्स, प्राध्यापक पदोन्नतीपासून वंचित आहेत. डॉक्टरांची शेकडो पदे रिक्त असल्याने पदव्युत्तरच्या जागाही कमी आहेत. मेडिकलमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या तब्बल ४०० जागा रिक्त आहेत. आऊटसोर्सिंगच्या नावाखाली या जागाच भरल्या नाहीत. यामुळे जागोजागी पडलेला कचरा, घाण व दुर्गंधीने उपचारासाठी आलेला रुग्ण बरा होईल का, ही शंका निर्माण होते. मेडिकलच्या क्षयरोग विभागाचा वॉर्ड तब्बल महिनाभरापासून डागडुजीच्या नावाखाली बंद आहे. रुग्णांवर आवश्यक उपचार होत नसल्याने अनेकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. मेयो आणि मेडिकलचे औषधांचे दरकरार ३१ जानेवारी २०१३ रोजी संपले. तेव्हापासून मुदतवाढ सुरू आहे. नुकतीच मे-२०१४ पर्यंत वाढविलेली वाढही संपली. यामुळे येथे इंजेक्शन द्यायला सिरिंज नाही. अपघातामधील जखमींना कित्येक तास उपचार मिळत नाहीत, औषधाचा खर्च रु ग्णालाच करावा लागत आहे.
नावाचेच सुपर
सुपर स्पेशालिटी हे इस्पितळ नावाचेच सुपर राहिले आहे. वस्तुत: याची स्थिती जिल्हा रुग्णालयापेक्षा थोडी चांगली आहे. मेडिकल आणि सुपरमध्ये एका गोष्टीचे विलक्षण साम्य आहे.
ते म्हणजे दोन्ही ठिकाणी मनुष्यबळाची वानवा आहे. येथे राजीव गांधी जीवनदायी योजनेतील रुग्णालाही औषध आणि साधनसामग्री विकत आणावी लागते. डॉक्टर फी घेत नाही हीच काय ती रुग्णांना सवलत. (प्रतिनिधी)

Web Title: Minister Saheb, will there really be a "good day"?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.