धनुष्यबाण चिन्ह मिळालं नाही तर...; मंत्री शंभुराज देसाईंनी सांगितला पुढचा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 02:38 PM2022-09-07T14:38:38+5:302022-09-07T14:39:53+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिथे जातात तिथे दुतर्फा लोक स्वागत करतात. तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे असं म्हणतात त्यामुळे आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत असं शंभुराज देसाई म्हणाले.

Minister Shambhuraj Desai reaction on Supreme Court Hearing over Shiv Sena Symbol | धनुष्यबाण चिन्ह मिळालं नाही तर...; मंत्री शंभुराज देसाईंनी सांगितला पुढचा प्लॅन

धनुष्यबाण चिन्ह मिळालं नाही तर...; मंत्री शंभुराज देसाईंनी सांगितला पुढचा प्लॅन

googlenewsNext

मुंबई - धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळेल असा आमचा विश्वास आहे. त्याचं कारण बहुमतातील शिवसेना ही आमच्याकडे आहे. आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच यातील सर्व लोकप्रतिनिधी जे लोकांमधून निवडून आलेत. त्यांचे बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे चिन्ह आम्हालाच मिळालं पाहिजे. परंतु शेवटी न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. जो निर्णय सुप्रीम कोर्ट देईल तो मान्य करत आम्ही आगामी निवडणुकीला सामोरे जावू असं मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे. 

शंभुराज देसाई म्हणाले की, धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळेल मात्र समजा, न्यायालयाने वेगळा निर्णय दिला तर आमची सर्वबाजूने तयारी सुरू आहे. लोकांना ज्वलंत हिंदुत्वाचे विचार घेऊन कोण पुढे चालले आहे. हे २ महिन्यात लोकांना पटलेले आहे. शेकडो लोक आम्ही जेव्हा मतदारसंघात जातो तेव्हा स्वागताला येतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिथे जातात तिथे दुतर्फा लोक स्वागत करतात. तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे असं म्हणतात त्यामुळे आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत. ठाकरे हे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार असतील परंतु विचारांचे वारसदार आम्हीच आहोत असं त्यांनी सांगितले. 

तसेच बाळासाहेबांच्या विचाराने पुढे जाताना नवीन चिन्ह लोकांपर्यंत रुजवण्यास वेळ लागेल. परंतु आम्ही ते लोकांपर्यंत घेऊन जावू. कष्ट करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही शाखाप्रमुख, बूथप्रमुखांपर्यंत शिवसेना पोहचवली आहे. त्यामुळे आम्हाला फारसी अडचण येणार नाही असा विश्वासही शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला. 

मनसे युतीचा निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा
दरम्यान, मनसेसोबत युतीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. आम्ही जे ४० आमदार शिंदेसोबत आहोत त्यांनी एक ओळीचा ठराव पहिल्या दिवशी केला आहे. जो निर्णय घ्यायचा आहे त्याचे अधिकार एकनाथ शिंदेंना दिले आहेत. राज ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे गेले तर आम्हालाही आनंद होईल. हिंदुत्ववादी विचारांचे विभाजन होऊ नये हे आमचेही मत आहे. २०१९ मध्ये युतीच्या माध्यमातून आम्ही मते मागितली. परंतु सरकार बनवताना लोकांच्या मतांचा अनादर करत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलो. भाजपाला बाजूला ठेवले. लोकांना आजही हिंदुत्ववादी विचारांचे विभाजन नकोय. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर जे नेते ठरवतील ते मान्य करू असं मंत्री शंभुराज देसाईंनी सांगितले. ते टीव्ही ९ च्या मुलाखतीत बोलत होते. 

दसरा मेळावा शिवतीर्थावर होईल
दसरा मेळावा हा ज्वलंत हिंदुत्ववादी विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारे जे आम्ही खरे वारसदार आहोत. तो आमचाच होणार. वर्षावरील गणरायाच्या दर्शनानंतर आमदारांनी शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची आग्रही मागणी केली. आमचाच दसरा मेळावा शिवतीर्थावर होईल असा विश्वासही मंत्री देसाई यांनी व्यक्त केला. 

महाराष्ट्र नंबर वन करण्यासाठी गणरायाला साकडं  
२ वर्षाच्या कोविडनंतर राज्य हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आगामी २ वर्षात महाराष्ट्र राज्य देशात नंबर वन करण्याची ताकद, शक्ती आणि आशीर्वाद बाप्पानं आम्हाला द्यावा असं साकडं मी गणराया चरणी केली आहे असं शंभुराज देसाईंनी सांगितले. 
 

Web Title: Minister Shambhuraj Desai reaction on Supreme Court Hearing over Shiv Sena Symbol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.