कृषी राज्यमंत्र्यांची वसई तालुक्यात धावती भेट, शेतकऱ्यांसोबत संवाद नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 11:04 PM2019-11-04T23:04:42+5:302019-11-04T23:04:51+5:30
शेतकरी नाराज : शेतकऱ्यांसोबत संवाद नाही
पारोळ : पावसामुळे भात शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी रविवारी पालघर जिल्ह्यात आलेले कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वसई तालुक्यातील कोपर या गावी धावती भेट दिली. मात्र, शेतकऱ्यांशी न बोलता वसईचा हा पाहणी दौरा त्यांनी अवघ्या १० मिनिटात आटोपला. पण आपल्या समस्या मांडण्यासाठी जास्त वेळ न दिल्याने शेतकरी नाराज झाले.
कोपर गावातील किशोर किणी यांनी शेतीच्या पंचनाम्याला तारखेची मुदत न ठेवता वसई तालुक्यातील शेवटच्या शेतकºयाचाही पंचनामा झाला पाहिजे अशी विनंती केली आणि कृषीराज्यमंत्री खोत यांनी याबाबत संबंधित अधिकाºयांना सूचना केल्या.
राज्यात परतीच्या पावसाने भात पिकांचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकºयांवर संकट कोसळले. या भात शेतीच्या नुकसानी पाहणी करण्यासाठी कृषीराज्य मंत्री पालघर जिल्ह्याच्या दौºयावर आले होते. त्यांनी वसई तालुक्यातील कोपर या गावात भात पीक नुकसानीची पाहणी केली. ते पाच वाजता शिरसाड येथे वसईतील शेतकरी यांच्याशी संवाद साधणार आहेत, असे मेसेज सर्व शेतकºयांना पाठवले होते. त्यासाठी काही शेतकरी शिरसाड तलाठी कार्यालयात थांबले होते. मात्र, कृषीराज्यमंत्र्यांनी नियोजित वेळेच्या आतच कोपर गावाला भेट देत आपला दौरा आटोपता घेतला. त्यामुळे शिरसाड येथे जमलेल्या शेतकºयांची निराशा झाली. कृषी राज्यमंत्र्यांनी आमच्या गावाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. पण त्यांनी संवाद साधला असता तर आम्ही शेतीबाबत अडचणी मांडल्या असत्या, असे सदानंद किणी यांनी सांगितले.