त्यांना धरून चोपलं पाहिजे, त्याशिवाय सुधारणार नाहीत; राज्यमंत्री बच्चू कडू आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 09:49 AM2020-08-23T09:49:32+5:302020-08-23T09:50:05+5:30
बोगस बियाणांच्या प्रश्नावरून बच्चू कडू आक्रमक; बियाणं कंपन्यांच्या मालकांना इशारा
मुंबई: बोगस बियाणांमुळे हाताशी आलेलं पीक गेल्यानं शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सोयाबीनची शेती करणाऱ्यांना बोगस बियाण्यांचा मोठा फटका बसला आहे. त्यावरून राज्यमंत्री बच्चू कडूंनी राज्य सरकारला घरचा अहेर दिला आहे. राज्यातील कृषी खातं झोपलंय का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यासोबतच त्यांनी महाबीजवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत.
बोगस बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे सुरू असून शेतकऱ्यांना लवकरच मदत दिली जाईल, अशी माहिती बच्चू कडूंनी दिली. 'पंचनामे करण्याचं काम सुरू आहेत. तहसीलदार, तालुका कृषी जिल्हाधिकारीदेखील सोबत आहेत. शेतीची सार्वत्रिक तपासणी करण्यात येईल. बियाणामुळे रोग पडला की वातावरणात काही रोग आहे, हे तपासलं जाईल. पंचनामे होतील. ज्यांनी विमा काढलाय, त्यांना विम्याचे पैसे मिळतील. बाकीच्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत दिली जाईल,' असं कडू म्हणाले.
ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री बच्चू कडूंनी कृषी विभागाला लक्ष्य केलं. 'सोयाबीन पिकवणारा शेतकरी यंदा पूर्णपणे घायाळ करून टाकला आहे. पेरलं तेव्हा निघालं नाही आणि पीक हातात आलं तेव्हा मारून टाकलं. राज्यातलं कृषी खातं झोपलंय की काय अशी स्थिती आहे. जेव्हा बियाणांचं प्रमाणीकरण होतं, त्यावेळी काही बदमाशी होते का, असा प्रश्न मला पडतो. महाबीजनं बाजारातलं बियाणं घेतलं असा माझा स्पष्ट आरोप आहे. बाजारातून सर्वात निकृष्ट बियाणं २-३ हजार रुपये क्विंटल दरानं खरेदी करून ८ हजार रुपये क्विंटल दरानं विकलं,' असा गंभीर आरोप त्यांनी केला.
कृषी विभागाच्या कारभाराबद्दल बच्च कडूंनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी बियाणं तयार करणाऱ्या कंपन्यांच्या मालकांना थेट इशारा दिला. 'दरवर्षी अशीच स्थिती आहे. ५० वर्षांत परिस्थिती जराही बदलेली नाही. बियाणं चांगलं मिळालं, असं एक वर्षही जात नाही. या प्रकरणात जो आरोपी आहे, कंपनीचा मालक आहे, त्याला धरून चोपलं पाहिजे. त्याच्याशिवाय यात सुधारणा होणार नाही,' अशी आक्रमक भूमिका कडू यांनी मांडली.