राज्यमंत्री दिलीप कांबळे पोलिसांना सापडेनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 07:05 AM2019-04-13T07:05:41+5:302019-04-13T07:06:04+5:30
औरंगाबाद : विदेशी दारू विक्री दुकानाचे लायसन्स देण्याच्या आमिषाने औरंगाबादच्या व्यापाऱ्यास १ कोटी ९२ लाख रुपयांचा गंडा घातल्याबद्दल महिन्यापूर्वी ...
औरंगाबाद : विदेशी दारू विक्री दुकानाचे लायसन्स देण्याच्या आमिषाने औरंगाबादच्या व्यापाऱ्यास १ कोटी ९२ लाख रुपयांचा गंडा घातल्याबद्दल महिन्यापूर्वी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल झाला, पण पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केली नाही. आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कोर्टाच्या आदेशानुसार, दिलीप कांबळे, दिलीप काळभोर, दयानंद वनंजे व सुनील मोदी यांच्याविरुद्ध मार्चमध्ये गुन्हा दाखल झाला. खुलताबाद तालुक्यातील विलास दादाराव चव्हाण यांचा बीअर बार, रेस्टॉरंटचा व्यवसाय आहे. दिलीप काळभोर त्यांचा नातेवाईक असून, त्याने त्यांना दारूविक्रीचा परवाना मिळवून देतो, असे सांगून १ कोटी ९२ लाख रुपये उकळले. त्यासाठी तत्कालीन उत्पादनशुल्क राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची व विलास चव्हाण यांची भेट करून दिली. मुंबईतील एका बंद दारू दुकानाचे लायसन्स हस्तांतरित करून देण्यासाठी आरोपींनी २ कोटी १५ लाख रुपयांची मागणी केली. आॅक्टोबर, २०१५ ते २० मे, २०१८ या कालावधीत चव्हाण यांनी तब्बल १ कोटी ९२ लाख रुपये आरोपींना दिल्याची तक्रार आहे.
...अन् शब्द पाळलाच नाही
मंत्री कांबळे यांचे खाते बदलले गेले, त्यामुळे दारू दुकानाचा परवाना हस्तांतरण करून देण्याचा शब्द त्यांनी पाळला नाही. एवढेच नव्हे, तर चव्हाण यांच्याकडून घेतलेले पैसे परत देण्यास नकार दिला. यामुळे चव्हाण यांनी याविषयी मार्च महिन्यात पोलिसांत तक्रार दिली. मात्र, तक्रारीत मंत्र्यांचे नाव असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे चव्हाण यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधितांवर सिडको पोलीस ठाण्यात मार्च महिन्यात गुन्हा नोंद झाला.