आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना कर्नाटक प्रवेशास मज्जाव, ताफा परत पाठवला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 07:22 PM2021-01-17T19:22:44+5:302021-01-17T19:23:41+5:30
Rajendra Patil-Yadravkar : मंत्री यड्रावकर हे गेल्या वर्षीही हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावच्या दिशेने निघाले होते. त्यावेळीही त्यांना कोगनोळी येथील टोल नाक्यावर अडवण्यात आले होते.
- बाबासो हळीज्वाळे
कोगनोळी : सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावच्या दिशेने जात असलेल्या महाराष्ट्र राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा ताफा कोगनोळी येथील टोलनाक्यावर कर्नाटक पोलिसांनी अडवून परत पाठवला.
अनेक वर्षांपासून मराठी भाषिक सीमाभाग हा महाराष्ट्राशी जोडण्यात यावा, यासाठी सीमाभागातील नागरिक लढा देत आहेत. या लढ्यांमध्ये 13 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे बेळगावच्या दिशेने निघाले होते. त्यांचा ताफा कोगनोळी येथील टोलनाक्याजवळ आला असता कर्नाटक पोलिसांनी अडवला. कर्नाटकात प्रवेश करू न देता परत पाठीमागे पाठवला. पोलिसांच्या या कारवाईविरोधात राज्यमंत्री यड्रावकर यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव आणि सीमा भागासाठीची न्यायालयीन लढाई नक्कीच जिंकू आणि बेळगाव, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण करु. आम्ही हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, असे यावेळी राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले.
गेल्या वर्षीही केली होती अडवणूक
मंत्री यड्रावकर हे गेल्या वर्षीही हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावच्या दिशेने निघाले होते. त्यावेळीही त्यांना कोगनोळी येथील टोल नाक्यावर अडवण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी इतर मार्गांचा अवलंब करत बेळगाव पर्यंत पोहोचण्यात यश मिळवले होते. त्यानंतर त्यांना तिथून महाराष्ट्राच्या हद्दीत आणून सोडण्यात आले होते.
पोलिसांशी बाचाबाची
कर्नाटक शासनाच्या एएसआय दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याने मंत्री यड्रावकर यांना "ही आमची हद्द आहे तुमच्या हद्दीत जाऊन तुम्हाला जे काय करायचे ते करा" असे म्हटल्याने थोडा वेळ तणाव निर्माण झाला. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मंत्री यड्रावकर यांची समजूत काढली.