राज्यमंत्री खोतकर यांचा ५०० कोटींचा घोटाळा
By admin | Published: August 18, 2016 07:01 AM2016-08-18T07:01:20+5:302016-08-18T07:01:20+5:30
राज्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री व शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी ५०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती मेनन-शर्मा यांनी केला आहे. खोतकर
मुंबई : राज्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री व शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी ५०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती मेनन-शर्मा यांनी केला आहे. खोतकर जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या ९ वर्षांपासून सभापती असून पदाचा गैरवापर करून त्यांनी हा घोटाळा केल्याचा दावा मेनन यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
खोतकर यांनी नातेवाइकांसह मित्र परिवाराला बाजार समितीमधील सुमारे २५० हून अधिक गाळे बेकायदेशीरपणे विकल्याचे मेनन यांचे म्हणणे आहे. त्या म्हणाल्या की, बाजारभावानुसार येथील एका गाळ्याची किंमत ४० ते ५० लाख रुपये आहे. मात्र खोतकर यांनी त्यांच्या नजीकच्या ४० लोकांना सुमारे २५० हून अधिक गाळे प्रत्येकी ५० हजार रुपयांपासून ५ लाखांपर्यंतच्या किमतीला विकले आहेत. अशा प्रकारे गेल्या ९ वर्षांत खोतकर यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप मेनन यांनी केला आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गैरव्यवहारांवर लेखा परीक्षकांनीही बोट ठेवले आहे. मात्र तरीही सभापती म्हणून खोतकर यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. कारण ते स्वत: या घोटाळ्यात सामील असल्याचे मेनन यांचे म्हणणे आहे.
मुख्यमंत्र्यांकडे क्लीन चीट बँक!
याआधी भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याविरोधात आपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यांना मुख्यमंत्र्यांना क्लीन चीट दिली. त्यामुळे खोतकर यांनाही मुख्यमंत्र्यांकडून क्लीन चीट मिळेल. मुख्यमंत्र्यांकडे क्लीन चीट देणारी बँक आहे, अशा शब्दांत मेनन यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली........
मग ही कृषी उत्पन्न बाजार समिती कशी?
खोतकर यांनी जालनाच्या बाजार समितीमध्ये वाटप केलेले गाळे हे बिगर कृषी व्यवसायांसाठी दिल्याचे मेनन यांनी सांगितले. दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हक्काचे व्यासपीठ असलेल्या बाजार समितीमध्ये आॅटोमोबाईल, स्टील, फर्निचर, पाईप, पत्रा, जनरल यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. शिवाय मल्टीप्लेक्स आणि पेट्रोलपंप यांचे बांधकाम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नियमानुसार लिलाव
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील गाळ्यांचा राज्य व विभागीय पातळीवरील वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देऊन नियमानुसार लिलाव करण्यात आलेला आहे. त्याद्वारे गाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. नियमबाह्य कुठलेही काम झालेले नाही. माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित व धादांत खोटे आहेत, असे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले.