राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय जुलै महिन्यातच, राज्यमंत्री सतेज पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 07:07 AM2021-08-21T07:07:03+5:302021-08-21T07:07:39+5:30
Satej Patil : ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुरस्कारांची घोषणा करण्यात येईल व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात येईल, असेही राज्यमंत्री पाटील यांनी सांगितले.
मुंबई : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्था, व्यक्तींना ‘राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पुरस्कार’ देण्याचा निर्णय जुलै महिन्यातच घेण्यात आला होता. केंद्र सरकारने खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्याच्या आधीच त्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे या दोन्हींचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट करतानाच, राज्यात पाच विभागात हा पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती राज्याचे माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी दिली.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पुरस्कारांसाठी आयटी इंजिनियरिंग सर्व्हिस सॉफ्टवेअर, आयटी एनेबल्ड सर्व्हिस (बीपीओ/केपीओ), आयटी इंफ्रास्ट्रक्चर (डेटा सेंटर), मोस्ट प्रॉमिसिंग स्टार्टअप आणि स्पेशल अवॉर्ड फॉर कॉन्ट्रिब्युशन टू महाराष्ट्र असे पाच विभाग करण्यात आले आहेत. या पाच विभागात पुरस्कारांची निवड होणार असून मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असणार असल्याचे राज्यमंत्री पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावर्षीच्या पुरस्कारांचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. आज २० तारखेला राजीव गांधी यांच्या जयंती दिनापासून नामांकनासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. १५ सप्टेंबर २०२१ ही नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख असेल, तर २० ऑक्टोबरपर्यंत छाननी समितीच्या सर्व बैठका पार पडतील. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुरस्कारांची घोषणा करण्यात येईल व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात येईल, असेही राज्यमंत्री पाटील यांनी सांगितले.