अनेक वर्षांनी योग आला, पण त्यासाठी पायगुणही असावा लागतो; चिपी विमानतळाच्या उद्घाटनाप्रसंगी सुभाष देसाईंची फटकेबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 01:29 PM2021-10-09T13:29:56+5:302021-10-09T13:31:10+5:30
सर्वांनी चांगलं ध्येय डोळ्यासमोर ठेवून एकत्र काम केलं तर काय होतं हे या विमानतळाच्या दृष्टीनं दिसून येतं, देसाई यांचं वक्तव्य.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चिपी विमानतळाचं अखेर सर्वांसाठी खुला होत आहे. या विमानतळाच्या उद्धाटनाप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane), पर्यावर मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), खासदार विनायक राऊत (Vinayak Raut), रामदास आठवले सुभाष देसाई आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. तसंच या कार्यक्रमासाठी नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde) हेदेखील उपस्थित होते. यावेळी मंचावरून सुभाष देसाई यांनी तुफान फटकेबाजीही केली.
"अनेक वर्षांनी विमानतळाचा हा योग आला. अनेक वर्ष काम प्रलंबित होतं असं अनेक जण म्हणतात. परंतु काम पूर्ण होण्यासाठी पायगुणही लागतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रुपानं पायगुणानं हे काम पूर्ण झालं. खासदार विनायक राऊत यांनी सातत्यानं या विमातळासाठी पाठपुरावा केला. पाठपुरावा झाला नाही, असा एकही महिना त्यांचा गेला नाही," असं देसाई यावेळी म्हणाले.
एमआयडीसीनंदेखील या विमानतळासाठी सातत्यानं काम केलं. विमानतळाचा पाणीपुरवठा, वीजपुरवठा, विमानतळासाठी भूसंपादन ही प्रक्रिया पूर्ण केली. आज हे विमानतळाचं काम पूर्ण झालं आहे. सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे. यामुळे कोकणवासीयांचा उत्कर्ष होईल. सर्वांनी चांगलं ध्येय डोळ्यासमोर ठेवून एकत्र काम केलं तर काय होतं हे या विमानतळाच्या दृष्टीनं दिसून येतं. कोकणवासीयांची जी स्वप्न आहेत ती नक्कीच साकार होतील. या विमातळामुळे पर्यटन वाढणार असल्याचंही ते म्हणाले.
स्वस्त प्रवास
"आज पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत. गाडीनं या ठिकाणी यायचं म्हटलं तरी किमान ५ हजार रूपये लागतात. परंतु यासाठी भारत सरकार आणि राज्य सरकारच्या अनुदानाच्या माध्यमातून २४०० रूपयांत प्रवास करता येणार आहे. हे नक्कीच दिलासादायक आहे," असं देसाई यावेळी म्हणाले.