राज्यातील नाट्यगृहांचे अत्याधुनिकीकरण करणार, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 07:34 AM2022-09-29T07:34:54+5:302022-09-29T07:49:02+5:30
योजना तयार करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी एका बैठकीत दिले.
मुंबई : राज्यातील नाट्यगृहांचे आधुनिकीकरण आणि अद्ययावतीकरण करण्याची योजना तयार करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी एका बैठकीत दिले. राज्यातील नाट्यगृहांच्या समस्यांबाबत बैठक मंत्रालयात मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी नाट्य निर्माता दिलीप जाधव, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, विद्या वाघमारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव प्रशांत नवघरे उपस्थित होते.
प्रत्येक नाट्यगृहाच्या अत्याधुनिकीकरणासाठी चार ते दहा कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्याच्या निधी वाटपाचे टप्पे निश्चित करण्यात येतील. राज्यात सध्या एकूण ८३ नाट्यगृहे आहेत. यापैकी खाजगी २८, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अखत्यारित ५१ आणि राज्य शासनाची ४ नाट्यगृहे आहेत. या सर्व नाट्यगृहांचे आधुनिकीकरण पुढील १० वर्षांत करण्यात येईल.
जग थक्क होईल असे वस्तुसंग्रहालय उभारणार
राज्याचे संपूर्ण सांस्कृतिक वैभव प्रदर्शित होण्याबरोबरच अवघे जग थक्क होईल, असे राज्य वस्तुसंग्रहालय महाराष्ट्रात साकारण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. हे संग्रहालय कुठे उभारणार याची घोषणा मात्र त्यांनी केली नाही.
या संकल्पिक वस्तुसंग्रहालयामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाचे महत्त्वाचे कालखंड जसे की, अश्मयुगीन, प्रागैतिहासिक काळ, ऐतिहासिक व मध्ययुगीन काळ, मराठा व ब्रिटिश कालखंड तसेच महाराष्ट्रातील लोकजीवन व आदिवासी संस्कृती, स्वातंत्र्य लढा व संयुक्त महाराष्ट्र चळवळ व आधुनिक महाराष्ट्रासंबंधी विविध दालने यांचा समावेश असेल. यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.