गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना सुधीर मुनगंटीवारांनी दाखवली 'प्रकाश'वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2023 05:27 PM2023-02-28T17:27:07+5:302023-02-28T17:28:47+5:30
रुग्णांना मिळवून दिले तब्बल २ कोटी ७३ लक्ष रुपयांचे पंचतारांकित उपचार...
राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांच्या आयुष्यात नवी प्रकाशवाट मिळाली आहे. यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, रायगड, अमरावती, चंद्रपूर,उस्मानाबाद, परेल (मुंबई) अशा राज्यभरातील रुग्णांना मुनगंटीवार यांनी केलेल्या सहकार्यातून दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांवर उपचार शक्य झाले. शिवाय या रुग्णांवर मुंबई येथील पंचतारांकित रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया पार पडल्या. या रुग्णांसाठी सुधीर मुनगंटीवार हे देवदूत ठरले आहेत.
असाध्य आजारांनी ग्रस्त असलेल्या ३० रुग्णांच्या उपचारासाठी आतापर्यंत मुनगंटीवार यांनी घेतलेल्या पुढाकाराने २ कोटी ७३ लक्ष रुपयांच्या शस्त्रक्रीयेवरील खर्च व उपचारासाठी आलेला खर्च शासकीय योजनेच्या माध्यमातून केला आहे. या योजनेच्या माध्यमातून वॉल रिप्लेसमेंट पासून तर कर्करोगापर्यंतची शस्त्रक्रिया पार पडलेली आहे, त्यामध्ये एक महिन्याच्या बालकापासून ते ५५ वर्षांपर्यंतच्या रुग्णांवर उपचार करण्यात आलेले आहेत. उपचारानंतर अनेक रुग्णांनी प्रत्यक्ष फोन करून व पत्र लिहून मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.
सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून मुनगंटीवार यांनी मतदार संघासोबत चंद्रपूर जिल्ह्यात नेत्र चिकित्सा शिबीर, महाआरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, चष्मेवाटप हे उपक्रम मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून नियमित होत असतात. जिल्ह्यातील रुग्णांना अत्याधुनिक उपचार उपलब्ध व्हावे, यासाठी कॅन्सर हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज चंद्रपूरात आणण्यात आले. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णांवर उपचार व्हावे, याकरिता मुनगंटीवार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.