शिवरायांची वाघनखं शिवप्रेमींसाठी शिवदर्शन ठरणार, हा दुग्धशर्करा योग; एकनाथ शिंदेंचं मत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 09:08 AM2023-10-04T09:08:11+5:302023-10-04T09:14:01+5:30
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सामंजस्य करारावेळी दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.
लंडन येथे आज ढोल आणि ताशांच्या निनादात आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय ' या जयघोषात अतिशय स्फूर्तिदायक वातावरणात वाघनखं भारतात आणण्याच्या करारावर आज व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियमचे संचालक ट्रायस्टम हंट यांनी स्वाक्षरी केली. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योग मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवस्पर्श झालेली ही वाघनखं नोव्हेंबर २०२३ ते नोव्हेंबर २०२६ या तीन वर्षांच्या कालावधीकरिता भारतात राहतील. ही वाघनखं महाराष्ट्रातील विविध संग्रहालयात शिवप्रेमी, इतिहासप्रेमी नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार असून यात सातारा, नागपूर, कोल्हापूर येथील राज्य पुरातत्व विभागाच्या संग्रहालयांसह मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचा समावेश राहणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सामंजस्य करारावेळी दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत महत्त्वाची भूमिका असलेल्या गनिमी काव्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही वाघनखं असून शिवछत्रपतींची ही वाघनखं आता केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील तमाम शिवप्रेमींसाठी एक प्रकारे शिवदर्शन ठरणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सर्व शिवप्रेमींसाठी, अवघ्या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी सुद्धा आजचा हा क्षण ऐतिहासिक आहे. शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्धापनदिनाचा सोहळा राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला. याच वर्षात आपण शिवछत्रपतींच्या पराक्रमाचे प्रतीक असणारी ही वाघ नखं शिवभूमीत आणत आहोत, हा दुग्धशर्करा योग असल्याचे सांगून शिवस्पर्श झालेली ही वाघनखं आपल्यासाठी अनमोल आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
शिवप्रेमींसाठी ऐतिहासिक क्षण....
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 3, 2023
लंडनहून वाघनखं भारतात आणण्याच्या करारावर आज लंडन येथे व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियमचे संचालक ट्रायस्टम हंट यांनी स्वाक्षरी केली. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योग मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आदी… pic.twitter.com/vY4kYAxok2
शिवराज्याभिषेकाच्या निमित्तानं सांस्कृतिक कार्य विभागानं हा आगळा संकल्प केला आणि तो पूर्णत्वासही नेला, त्याबद्दल या विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सांस्कृतिक विभागातील त्यांचे सहकारी कौतुकास पात्र आहेत, असे कौतुकही एकनाथ शिंदे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दूरदृष्टी असलेला राजा भारतात दुसरा झाला नाही. शिवछत्रपतींची ही वाघनखं आता केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील तमाम शिवप्रेमींसाठी एक प्रकारे शिवदर्शन ठरणार आहे. शिवप्रतापाचं स्मरण करून देणारं ते निमित्त ठरेल. या शिवप्रतापाची प्रेरणा घेऊनच आपली पुढची पिढी महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शावर वाटचाल करणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.