मंत्रिपद कसं आणि कुणामुळे मिळालं?; उदय सामंतांनी उद्धव ठाकरेंना दिलं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 06:18 PM2024-02-06T18:18:30+5:302024-02-06T18:19:24+5:30

मिलिंद नार्वेकर जरी आमच्यासोबत नसले तरी त्यांचे नाव घेतोय याचा अर्थ केलेल्यांची जाण ठेवणारे आम्ही आहोत असंही उदय सामंत यांनी म्हटलं. 

Minister Uday Samant criticized Uddhav Thackeray | मंत्रिपद कसं आणि कुणामुळे मिळालं?; उदय सामंतांनी उद्धव ठाकरेंना दिलं प्रत्युत्तर

मंत्रिपद कसं आणि कुणामुळे मिळालं?; उदय सामंतांनी उद्धव ठाकरेंना दिलं प्रत्युत्तर

मुंबई -  Uday Samant On Uddhav Thackeray ( Marathi News ) कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि आताही आहे. आता जो बालेकिल्ला आहे तो एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शिवसेनेचा आहे.  व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येकाची नार्कोटेस्ट केली असती तर त्यांच्यासोबत किती लोक आहेत आणि शिंदेसोबत किती येणार आहेत ते दिसले आहे. कोकणात काहीही बदल झालेला नाही. कोकणातील दोन्ही जागी महायुतीचे उमेदवार निवडून येतील. आमच्या संघटनेवर, सरकारवर आणि भविष्यातील निवडणुकीवर उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा काहीही परिणाम झालेला नाही. माझ्या मंत्रिपदाचे आणि पक्ष प्रवेशाचे श्रेय कुणी घेऊ नये असं प्रत्युत्तर मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंना दिले. 

मंत्री उदय सामंत म्हणाले की, खरं बोलायची स्पर्धा ठेवली पाहिजे. मी त्यांच्या वयाचा मान ठेवतो. मी मातोश्रीवर जात नव्हतो हे जगजाहीर आहे. मिलिंद नार्वेकरांनी मध्यस्थी केली आणि मला मातोश्रीवर घेऊन गेले. मातोश्रीवर घेऊन गेल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, बाळासाहेब गेल्यानंतर हा माझ्यासाठी सुखद धक्का आहे की एक राज्यमंत्री माझ्या पक्षात प्रवेश करतोय. तुम्हाला आमच्याकडून निवडणूक लढवावी लागेल. तेव्हा भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळी झाली होती. त्यातून मी निवडणूक लढलो आणि ४१ हजार मतांनी निवडून आलो. प्रवेशावेळी मला सांगितले सत्ता आल्यानंतर त्यात पाच जरी मंत्री झाले तरी तुम्हाला आम्ही मंत्री करू. पण मी जबाबदारी सांगतो, म्हाडाचे अध्यक्ष ठाकरेंनी मला केले असं ते भाषणात बोलले. परंतु लांजा गेस्टहाऊसला मला देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला. तुला मंत्रिपद मिळेल न मिळेल परंतु म्हाडा प्राधिकरण तू चांगल्यारितीने सांभाळू शकतोस त्यामुळे तुला अध्यक्ष बनवतोय असं सांगितले. त्यामुळे ते कोणामुळे मिळाले हे कळाले. 

तसेच जा मंत्रिपदाची शपथ घे असं भाषणात उद्धव ठाकरेंनी सांगितले. परंतु जेव्हा मंत्रिपदाचा विस्तार झाला. त्याच्या आदल्या दिवशी उबाठाचे प्रमुख हे नाशिकमध्ये होते. त्यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर आणि सुभाष देसाई होते. आधी नार्वेकरांनी त्यानंतर सुभाष देसाईंनी मला फोन केला आणि मंत्रिपदाची यादी वाचून दाखवली. त्यामुळे ठाकरेंनी भाषणात जे सांगितले, मी त्याला बोलावले आणि जा मंत्रिपदाची शपथ घे असं बोललो हे काहीही झाले नाही. आमच्या रक्तात लाचारी नाही. बाळासाहेबांनी सांगूनसुद्धा काँग्रेससोबत जाणे याला लाचारी म्हणतात. मिलिंद नार्वेकरांनी मध्यस्थी केली म्हणून मी पक्षात प्रवेश केला. त्यामुळे माझ्या मंत्रिपदाची आणि प्रवेशाचे श्रेय कुणी घेऊ नये. माझ्या मंत्रिपदाची शिफारस ही एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकरांनी केली. माझे नाव यादीतून वगळ्याचा डाव नाशिकमध्ये सुरू होता. परंतु एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकरांनी तो खोडून काढला. त्यामुळे मंत्रिपदी जाऊ शकलो. मिलिंद नार्वेकर जरी आमच्यासोबत नसले तरी त्यांचे नाव घेतोय याचा अर्थ केलेल्यांची जाण ठेवणारे आम्ही आहोत असंही उदय सामंत यांनी म्हटलं. 

 कोकणात एकपात्री कार्यक्रम

उद्धव ठाकरेंनी भाषणात उल्लेख केला की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेलेले आमदार गद्दार आहेत. त्यांना लाथ मारणार आहे. परंतु काँग्रेसच्या कुबड्या घेऊन उभे राहिलेत त्यांनी पक्ष म्हणून स्वत: उभे राहिले पाहिजे. निवडणुकीत शिवसेना-भाजपा लढले आणि त्यानंतर ते काँग्रेससोबत गेले. त्यामुळे कोकणातील मतदारांनी धडा घेतला आहे. मतदारांना डावलून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले त्यांना निवडणुकीत लाथ मारल्याशिवाय लोक गप्प बसणार नाही. कोकणात एकपात्री कार्यक्रम गेले २ दिवस बघायला मिळाला. उबाठा गटाचे काही आमदार शिंदेंचे नेतृत्व स्वीकारणार हे मी बोललो तसे झाले. आजही तेच सांगतोय, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये उद्धव ठाकरेंच्या व्यासपीठावर दिसणारे पदाधिकारी येत्या काही दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत दिसतील असा दावा उदय सामंतांनी केला. 

व्यवसाय न करता सहा मजली घर बांधले

माझ्या मतदारसंघात आल्यावर माझ्या व्यवसायावर टीका केली. टीका समजू शकतो हा पोटशूळ असेल. माझ्या कन्ट्रक्शन व्यवसायावर बोलले पण मी कधीही असा प्रश्न विचारला नाही की काही लोकांनी व्यवसाय न करता सहा सहा मजली घरे बांधली आहेत. प्रचंड नैराश्येतून दौरा झाला. जिल्हा कार्यालयासमोर ३ मीटरचा बोळातला रस्ता आहे तिथे मंडप टाकून सभा झाली. केवळ शिवीगाळ, बदनामी याशिवाय भाषणात काही नव्हते. जे सभेच्या व्यासपीठावर होते त्यातले काही जण भविष्यात एकनाथ शिंदेंसोबत व्यासपीठावर दिसतील असा टोला सामंतांनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

Web Title: Minister Uday Samant criticized Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.