'राजा रयतेचा असतो, समाजाचा नसतो; तलवार कुणाविरोधात उपसणार?', वडेट्टीवारांचा संभाजीराजेंना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 05:08 PM2020-10-09T17:08:30+5:302020-10-09T17:45:46+5:30

Vijay Wadettiwar Reaction on Sambhaji Raje :आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका, संयम कधी सोडायचा माहीत आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा इशारा खासदार संभाजीराजे यांनी राज्य सरकारला दिला.

minister vijay wadettiwar reaction on sambhaji raje statement on maratha reservation | 'राजा रयतेचा असतो, समाजाचा नसतो; तलवार कुणाविरोधात उपसणार?', वडेट्टीवारांचा संभाजीराजेंना सवाल

'राजा रयतेचा असतो, समाजाचा नसतो; तलवार कुणाविरोधात उपसणार?', वडेट्टीवारांचा संभाजीराजेंना सवाल

googlenewsNext

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे. मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी सरकारला जागे करण्यासाठी आजपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापुरातून सुरुवात झाली. यावेळी मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकारचे प्रयत्न कमी पडत असल्याचे दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय नाही, असा आरोप करत आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका, संयम कधी सोडायचा माहीत आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा इशारा खासदार संभाजीराजे यांनी राज्य सरकारला दिला. यावर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी राजा रयतेचा असतो, समाजाचा नसतो, तलवार कुणाविरोधात उपसणार? असा सवाल करत संभाजीराजेंवर निशाणा साधला आहे.

'तलवार कुणा विरोधात उपसणार?'
राजा रयतेचा असतो समाजाचा नसतो, तलवार कुणा विरोधात उपसणार? ओबीसी विरोधात, दलित विरोधात? तलवारीची भाषा का? असे सवाल विजय वडेट्टीवार यांनी केले आहेत. बहुजन लोकांसाठी आरक्षण देणाऱ्या राजाचे वारसदार वेगळी भाषा बोलतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समवेत इतर बलुतेदार होते. विरोध करणारे मोरे, जावळे होते, हा इतिहास आहे. राजाची भूमिका जनतेची हवी, केवळ एकाद्या समाजासाठी तलवार काढणे भाष्य योग्य नाही, अशा शब्दांत विजय वड्डेटीवार यांनी संभाजीराजेंना टोला लगावला.
 
'MPSC परीक्षा व्हावी'
एमपीएससी परीक्षेत 200 जागा आहेत. त्यात 23 जागा ह्या मराठा समाजासाठी आहेत. अडीच लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. वय जात, लग्नाचे प्रश्न असतात. माझी भूमिका विचारली तर परीक्षा व्हावी असे माझे मत आहे. परीक्षा स्थगित केली किंवा पुढे ढकलली तर नुकसान हे विद्यार्थ्यांच होणार आहे. त्यामुळे मराठा समाजातील मुलांचे नुकसान होऊ नये, यासाठीही विचार केला पाहिजे, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

काय म्हणाले संभाजीराजे?
मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकारचे प्रयत्न कमी पडत असल्याचे दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय नाही. आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका, संयम कधी सोडायचा माहित आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा इशारा भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. आम्ही भीक नाही तर हक्क मागत आहोत. आम्हाला आता गृहित धरु नका आणि कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका, असेही संभाजीराजे म्हणाले. याचबरोबर, आम्ही दिल्लीला पण येण्यासाठी घाबणार नाहीत, अशा शब्दांत संभाजीराजे यांनी राज्य सरकार व केंद्र सरकारला आव्हान दिले आहे. माझा पक्ष गेला खड्यात मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. राज्यात होणारी मराठा आंदोलने भाजपा पुरस्कृत नाहीत, असेही संभाजीराजेंनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: minister vijay wadettiwar reaction on sambhaji raje statement on maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.