मंत्र्यांच्या भोजनावळीवर बंदी
By admin | Published: December 12, 2014 12:34 AM2014-12-12T00:34:53+5:302014-12-12T00:34:53+5:30
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात मंत्र्यांच्या बंगल्यावर होणाऱ्या भोजनावळी, संगीताचे जलसे बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्यात दुष्काळ असताना
दुष्काळामुळे मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय : संगीताचे जलसेही बंद
नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात मंत्र्यांच्या बंगल्यावर होणाऱ्या भोजनावळी, संगीताचे जलसे बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्यात दुष्काळ असताना आपण स्वत: भोजनाचा कार्यक्रम आयोजित करणार नाही आणि तुम्हीही करू नका, असे त्यांनी सहकारी मंत्र्यांना बजावले आहे.
नागपूरमध्ये सध्या बऱ्यापैकी थंडी असल्याने साग्रसंगीत भोजनावळींस प्रारंभ झाला आहे. मंत्री, सचिव, अधिवेशन काळात दाखल झालेले लब्धप्रतिष्ठीत, उद्योजक, व्यावसायिक, पत्रकार आदींना निमंत्रित केले जाते. राज्यातील १९ हजारांहून अधिक गावात दुष्काळ असताना दिल्या जाणाऱ्या भोजनावळी हा टीकेचा विषय होऊ शकतो, अशी भीती वाटल्याने हे आदेश दिल्याची चर्चा आहे.
कामगार विभागाचे प्रधान सचिव अरविंद कुमार यांचे दारु पिऊन कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. त्यात मंत्र्यांच्या भोजनावळीत असा एखादा प्रकार घडला तर आणखी नामुश्की होईल, अशी शंका वाटल्यानेही हे आदेश सुटल्याचे समजते. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या तिरुपतीवारीवरील विमान खर्चाचा विषय चर्चेत आला. राज्यात दुष्काळ असताना भाजपाने एका मंत्र्याच्या विमानवारीवर खर्च का केला, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत केला. त्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांमध्ये महागड्या भोजनावळी देण्याची अहमहमिका लागली तर नवी डोकेदुखी वाढेल, अशी भीती वाटल्यानेही आदेश दिल्याचे समजते. दीर्घ काळानंतर राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आल्याने नातलग, मित्रपरिवार, मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने नागपूरमध्ये आले आहेत. अशावेळी त्यांच्या सन्मानार्थ भोजनाचा कार्यक्रम केला नाही तर नाराजी व्यक्त होऊ शकते, अशी भीती एका शिवसेना मंत्र्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर व्यक्त केली. (विशेष प्रतिनिधी)