मंत्रिमंडळ बैठकीवर मंत्र्याचा बहिष्कार
By admin | Published: June 24, 2015 04:29 AM2015-06-24T04:29:44+5:302015-06-24T04:50:47+5:30
शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना भाजपाच्या कॅबिनेट मंत्र्यांकडून मिळत असलेली दुय्यम वागणूक आणि वाट्याला आलेली दुय्यम खाती, यामुळे शिवसेनेत नाराजी धुमसत असून
यदु जोशी, मुंबई -
शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना भाजपाच्या कॅबिनेट मंत्र्यांकडून मिळत असलेली दुय्यम वागणूक आणि वाट्याला आलेली दुय्यम खाती, यामुळे शिवसेनेत नाराजी धुमसत असून सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकांवर काही दिवसांपासून बहिष्कार टाकून नाराजीला तोंड फोडले आहे.
शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते आणि मंत्री असलेले शिंदे गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ बैठकीला सतत दांडी मारत आहेत. आजही ते उपस्थित नव्हते. बैठकीला गैरहजर राहण्याबाबत तसे त्यांनी मुख्यमंत्र्यांना कळविले नव्हते. शिंदे हे आपल्याच पक्षातील आमदारांच्या रोषाचा सामना सध्या करीत आहेत. ‘आपले सरकार असूनही कामे होत नाहीत,’ असा सूर शिवसेनेच्या आमदारांनी लावला असून ते सातत्याने शिंदे यांच्याकडे तक्रारी करीत असतात. काही दिवसांपूर्वी शिवसेना आमदारांच्या बैठकीत या तक्रारींचा पाढा वाजला गेला होता. सेनेच्या राज्यमंत्र्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याची ओरड सुरुवातीपासून केली जात आहे. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडून राज्यमंत्री संजय राठोड यांना तर सहकार मंत्री चंद्रकांत पाटील हे त्यांचे राज्यमंत्री शिवसेनेचे दादा भुसे यांना अधिकार तर देत नाहीत. उलट, राज्यमंत्री म्हणून असलेल्या अधिकारांवर अधूनमधून गदा आणतात, अशी त्यांची तक्रार आहे.
याबाबत स्वत: शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोन-तीनवेळा तक्रार केली.
शिवसेना आमदारांच्या मतदारसंघांमध्ये निधी कमी मिळतो, मंत्रालयात त्यांची कामे होत नाहीत, आमदारांना विश्वासात न घेता अधिकारीच निर्णय घेतात अशा शिवसेनेच्या तक्रारी आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अलीकडेच शिवसेना मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत या तक्रारींचा पाढा मुख्यमंत्र्यांसमोर वाचण्यात आला होता. तरीही न्याय मिळत नसल्याने शिंदे यांनी बहिष्कारास्त्र काढले आहे.