भाजपा आमदारांना मंत्र्यांची नकारघंटा
By admin | Published: March 8, 2017 01:01 AM2017-03-08T01:01:11+5:302017-03-08T01:01:11+5:30
मुंबई महापालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या रस्त्यांमधील घोटाळ्यांची चौकशी महापालिका आयुक्तांकडून काढून ती विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) मार्फत करण्याची
मुंबई : मुंबई महापालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या रस्त्यांमधील घोटाळ्यांची चौकशी महापालिका आयुक्तांकडून काढून ती विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) मार्फत करण्याची जोरदार मागणी भाजपाच्या आमदारांनी आज विधानसभेत केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी त्यांना जोरदार पाठिंबादेखील दिला. मात्र, ही चौकशी आयुक्तांमार्फतच सुरू राहील, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी स्पष्ट केले.
मुंबई महापालिका निवडणुकीत स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रस्ते घोटाळ्यांवरून शिवसेनेवर सडकून टीका केली होती. त्यामुळे आज रस्ते घोटाळ्यांवर प्रश्नोत्तराच्या तासात विषय येताच सरकार काय भूमिका घेणार या बाबत उत्सुकता होती. राष्ट्रवादीचे जयंत पाटील, शशिकांत शिंदे, दिलीप वळसे पाटील आदी सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, भाजपाचे आशिष शेलार, अतुल भातखळकर, योगेश सागर, अमित साटम यांनी या प्रश्नावर आक्रमक होत एसआयटीमार्फत चौकशीची जोरदार मागणी केली. महापालिका आयुक्त हे स्थायी समितीचे सदस्य सचिव असतात. रस्ते बांधकामाबाबत स्थायी समितीने घेतलेल्या निर्णयांची चौकशी आयुक्त कशी काय करू शकतात, असा सवाल भाजपाच्या करीत भाजपाच्या सदस्यांनी सभागृह डोक्यावर घेतले. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनीही, ‘पारदर्शक निर्णय घ्या, असे सांगत त्यांना साथ दिली.
मात्र, राज्यमंत्री पाटील म्हणाले की, आयुक्तांनी आधीच या प्रकरणात चौकशी सुरू केलेली आहे. काही अधिकारी, कंत्राटदारांवर कारवाईदेखील झालेली आहे. गेल्या महिन्यात ज्या रस्त्यांच्या नवीन कामांचे निर्णय झाले त्यात अनियमितता असेल, निकष डावलून रस्त्यांची कामे असतील तर त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल.
सरवणकरांनी लढविला किल्ला
- स्थायी समितीच्या सदस्यांनी गेल्या महिन्यातील रस्ते बांधकाम निर्णयांची चौकशी करण्याची मागणी केली आहे, असे आशिष शेलार यांनी सुरुवातीला म्हटले होते.
त्यावर शिवसेनेचे सदा सरवणकर म्हणाले की, स्थायी समितीच्या बैठकीत त्या सदस्यांनी विरोध केला होता का ते तपासून पहा. तिथे हात वर करायचे आणि नंतर ओरड करायची हे बरोबर नाही, असे सरवणकर यांनी सुनावले.