मित्रपक्षांना मंत्रिपदे, महामंडळांचे गाजर!
By Admin | Published: May 10, 2015 03:47 AM2015-05-10T03:47:39+5:302015-05-10T03:47:39+5:30
सत्तेत वाटा देण्याच्या आश्वासनाची भाजपाने पूर्तता न केल्याने बिथरलेल्या रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासपा व शिवसंग्राम या पक्षाच्या नेत्यांनी सत्तेत १० टक्के वाटा मिळालाच
मुंबई : सत्तेत वाटा देण्याच्या आश्वासनाची भाजपाने पूर्तता न केल्याने बिथरलेल्या रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासपा व शिवसंग्राम या पक्षाच्या नेत्यांनी सत्तेत १० टक्के वाटा मिळालाच पाहिजे, असा आग्रह शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धरला. त्यावर येत्या जुलै महिन्यात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी पक्षश्रेष्ठींची परवानगी मिळाल्यावर मित्रपक्षांना मंत्रिपदे, महामंडळे दिली जातील, असे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचे या पक्षांच्या नेत्यांनी सांगितले.
रिपाइंचे रामदास आठवले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, राष्ट्रीय समाज पार्टीचे महादेव जानकर व शिवसंग्रामचे विनायक मेटे यांची वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे दोन तास बैठक झाली. राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला पराभूत करण्याकरिता भाजपाला साथ देताना प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना सत्तेत वाटा देण्याची आश्वासने दिली होती. सहा महिने उलटले तरी त्यापैकी कुठलेच आश्वासन पूर्ण केलेले नाही याबद्दल तीव्र चीड घटकपक्षांनी व्यक्त केली. आम्हाला दिलेली आश्वासने पूर्ण करतील अशाच नेत्याची आता आम्ही भेट घेऊ, अशी राणाभीमदेवी थाटाची घोषणा या नेत्यांनी केली. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निमंत्रणावरून त्यांनी त्यांची भेट घेतली आणि आपली नाराजी त्यांच्या कानी घातली.
यावर मुख्यमंत्री फडणवीस बैठकीत म्हणाले की, केंद्रीय नेतृत्वाची परवानगी मिळताच मित्रपक्षांना जुलै महिन्यातील पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व दिले जाईल. (विशेष प्रतिनिधी)