संघाने घेतले मंत्र्यांचे बौद्धिक
By admin | Published: August 24, 2015 01:41 AM2015-08-24T01:41:12+5:302015-08-24T01:41:12+5:30
राज्यात भाजपप्रणित सरकार सत्तेवर येऊन दहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी सरकार आणि पक्ष संघटनेमध्ये पाहिजे तसा समन्वय नाही. कार्यकर्ते,
औरंगाबाद : राज्यात भाजपप्रणित सरकार सत्तेवर येऊन दहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी सरकार आणि पक्ष संघटनेमध्ये पाहिजे तसा समन्वय नाही. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना चांगली वागणूक मिळत नाही आणि कामेही केली जात नाहीत, अशा तक्रारींचा पाढा वाचत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रविवारी येथे झालेल्या समन्वय बैठकीत मंत्र्यांचे बौद्धिक घेण्यात आले.
तीन केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्र्यांसह डझनभर मंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या वेळी संघप्रणीत विविध संघटना तसेच संबंधित खात्याचे मंत्री यांच्यात आमने-सामने चर्चा घडविण्यात आली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मराठवाडा, कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या विभागातील कार्यकर्त्यांच्या दोनदिवसीय समन्वय बैठकीचा समारोपही यावेळी झाला. संघाचे अ. भा. कार्यवाह दत्तात्रय होसबळे, क्षेत्र संचालक जयंतीभाई देसाडिया, क्षेत्र कार्यवाह सुनील मेहता, क्षेत्र प्रचारक डॉ. रवींद्र जोशी, विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक चौगुले, पूर्व सैनिक सेवा परिषदेचे लेप्ट. जन. व्ही. एन. पाटील, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मराठे, विवेकानंद रुग्णालयाचे डॉ. अशोक कुकडे, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांच्यासह अ.भा.वि.प., सामाजिक समरसता मंच, वनवासी कल्याण आश्रम, क्रीडा भारती, भारतीय किसान संघ, भारतीय मजदूर संघ या संघप्रणीत संघटनांच्या प्रतिनिधींची बैठकीस उपस्थित होती. मुख्यमंत्री व राज्य मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी, केंद्रीय मंत्री हे स्वयंसेवक या नात्याने बैठकीस उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे ही बैठक चर्चेची ठरली. राज्य सरकारच्या कामाविषयी गाऱ्हाणी मांडण्यासाठी मंत्र्यांना बोलावलेच नव्हते, असे प्रांत प्रचारप्रमुख वामन देशपांडे यांनी स्पष्ट केले.
संघाचा दावा काही असला, तरी बैठकीमागचे कारण वेगळेच होते. केंद्र व राज्यात भाजपचे सरकार असताना संघ व संबंधित संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना राज्यकर्त्यांकडून चांगली वागणूक मिळत नाही. त्यांच्या कामांचा निपटारा वेगाने केला जात नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. संघ व संबंधित संघटनांच्या काय अपेक्षा आहेत, याची राज्यकर्त्यांना जाणीव करून देण्यासाठी ही बैठक घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
संघांशी संबंधित विविध संघटना वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करतात. संघटनानिहाय कामाचा आढावा मंत्र्यांसमोर सादर करण्यात आला. संघटनेची सद्य: स्थिती, कामात येणाऱ्या अडचणी, संघटनात्मक विस्तार, आगामी योजना यांची विस्तृत माहिती देण्यात आली.