मंत्री, आमदारांना नको सेनेशी संग!
By admin | Published: January 11, 2017 05:27 AM2017-01-11T05:27:21+5:302017-01-11T05:27:21+5:30
आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेशी राज्य पातळीवर युती करण्यास स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुकूल असले
यदु जोशी / मुंबई
आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेशी राज्य पातळीवर युती करण्यास स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुकूल असले तरी भाजपाचे बहुतेक मंत्री आणि आमदारांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यामुळे जिल्हा पातळीवर युतीचा निर्णय घेण्याची मुभा भाजपाने स्वपक्षीयांना दिली आहे.
या निवडणुका होत असलेल्या जिल्ह्यांमधील मंत्री आणि पालकमंत्र्यांची बैठक काल रात्री उशिरा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झाली. त्या वेळी, जवळपास सर्वच मंत्र्यांनी युतीची घंटा आमच्या गळ्यात बांधू नका, असा सूर लावल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. केवळ भाजपाचे मंत्रीच नाही, तर पक्षाच्या आमदारांनीदेखील मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांना भेटून युतीचा निर्णय राज्य पातळीवरून घेऊ नका. परिस्थितीनुसार आम्हाला स्थानिक पातळीवर घेऊ द्या, असे साकडे घातल्याचे समजते.
‘शिवसेना आपला जुना मित्र आहे. आपली भूमिका युती व्हावी अशीच असली पाहिजे, असे मुख्यमंत्री कालच्या बैठकीत म्हणाले. विधानसभा निवडणुकीत युती तोडण्याचे खापर शिवसेनेने भाजपावर फोडले होते. त्यामुळे युती न होण्यासाठी भाजपा खलनायक ठरला, असे चित्र रंगविण्यात आले. या वेळी युती झाली नाही, तरी त्याचे खापर आपल्यावर फुटता कामा नये, याची पुरेपूर काळजी भाजपाकडून घेतली जात असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याकडे त्यादृष्टीने बघितले जात आहे.
सूत्रांनी सांगितले की, ‘वर्षा’वरील बैठकीत बहुतेक मंत्र्यांनी युतीविरोधी सूर लावला. त्यात मुंबईतील मंत्र्यांचाही समावेश होता. युतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ चालवायला आता वेळ नाही. त्यापेक्षा स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने लक्ष
केंद्रित करायला हवे, असे म्हणत काही मंत्र्यांनी सडेतोड भूमिका मांडली. शिवसेनेचे नेते हे पंतप्रधान नरेंद्र (पान २ वर)
मोदी, भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर जाहीर आणि पातळी सोडून टीका करीत असताना युती का म्हणून करायची, असा सवाल एका ज्येष्ठ मंत्र्याने केल्याचे कळते. सूत्रांनी सांगितले की, राज्याच्या पातळीवर युतीचा
एकत्रित निर्णय घेऊन तो संपूर्ण राज्यासाठी लागू करण्याऐवजी स्थानिक पातळीवर युतीचा अधिकार द्या, असे दोन मंत्र्यांनी सुचविले. त्यामुळे ज्यांना युती करायची ते करतील आणि ज्यांना ती करायची नाही त्यांच्यावर ती बंधनकारक नसेल, असे त्यांचे मत होते.
...म्हणून विरोध
विधानसभेवर निवडून येताना महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत तिकिटाचे ‘कमिटमेंट’ आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. उद्या युती झाली तर त्यातल्या अर्ध्या लोकांना तिकिटे देता येणार नाहीत आणि त्याचा फटका आपल्या विधानसभा निवडणुकीला २०१९मध्ये बसेल, या भूमिकेतून भाजपाचे मंत्री, आमदार युतीस अनुकूल नसल्याचे सांगण्यात येते.
नाहीतर, निवडणूक संपेल
युतीबाबत लवकर काय तो निर्णय झाला पाहिजे; नाहीतर निवडणूक संपून जाईल, असे
सांगत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीचा चेंडू आज भाजपाच्या कोर्टात टाकला.
निवडणुकीची उद्या घोषणा
महापालिका व जि.प. निवडणुकीची गुरुवारी घोषणा होईल, असे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली आहे.
भाजपाची आज मुंबईत बैठक
मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. आशिष शेलार, मुंबईचे काही पदाधिकारी यांची बैठक उद्या, बुधवारी होणार आहे.या बैठकीत मुंबईत शिवसेनेशी युती करण्याबाबत चर्चा करण्यात येईल, असे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालयात पत्रकारांना सांगितले.
दोन्ही निवडणुकांत युती करा, असे आदेश आम्ही जिल्हा पातळीवरील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. जिथे ते सोबत येतील तेथे युतीत लढू, नाहीतर स्वबळावर लढू. स्थानिक पातळीवर एकमत झाले नाही तर आम्ही एकमत करण्याचा प्रयत्न करू.
- खा. रावसाहेब दानवे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष