सचिवांच्या बदल्यांना मंत्र्यांची स्थगिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 03:15 AM2019-06-08T03:15:24+5:302019-06-08T03:15:37+5:30
पशुसंवर्धन विभागाचे सचिव अनुपकुमार यांच्या आदेशाने ३१ मे २०१९ रोजी नागपूर विभागातील ३७, कोकण विभागातील १४ पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या
मुंबई : पशुसंवर्धन विभागाच्या सचिवांनी विश्वासात न घेता बदली प्रक्रिया राबविल्याचा आरोप करत पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी सचिवांनी केलेल्या बदल्यांना स्थगिती दिली. त्यामुळे पशुसंवर्धन विभागातील बदल्यांवरून मंत्री आणि सचिव यांच्यातील मतभेद उघड झाले.
पशुसंवर्धन विभागाचे सचिव अनुपकुमार यांच्या आदेशाने ३१ मे २०१९ रोजी नागपूर विभागातील ३७, कोकण विभागातील १४ पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. सहायक आयुक्त पशुसंवर्धन (गट-अ) दर्जाच्या १५ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचेही आदेश देण्यात आले. संबंधित अधिकाºयांनी बदलीच्या पदावर हजर झाल्यानंतर लगेचच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्रासह रुजू अहवाल पशुसंवर्धन आयुक्तांकडे देण्याचेही आदेशात म्हटले होते. काही अधिकाºयांनी बदलीबाबत नाराजी व्यक्त केली. त्याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून दबावासाठी थेट पशुसंवर्धनमंत्र्यांकडे तक्रारी करण्यात आल्या.
मात्र या प्रक्रियेबाबत काहीच माहिती नसल्याने बदल्यांबाबत त्यांनी अनभिज्ञता व्यक्त केली. त्यानंतर सचिव स्तरावरून बदल्या झाल्याचे कळाल्याने तातडीने या बदल्यांना स्थगिती देण्यात आली. १ जून रोजी नव्याने आदेश काढून ठरावीक वेतनश्रेणीतील अधिकाºयांच्या बदलीचे अधिकार २०१९ या वर्षापुरते पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय मंत्र्यांकडे देण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने हे करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यायत आले आहे.
बदल्यांचे अधिकार संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडेच असतात. गेल्या वर्षीपुरते ते सचिवांकडे दिले होते. परंतु या वर्षी मला न विचारताच सचिवांनी बदल्यांची प्रक्रिया आटोपली. काही तक्रारींनंतर केलेल्या चौकशीत सचिवांनी परस्पर बदल्या केल्याचे समजले. माझ्यासमोर बदल्यांची फाइल पण ठेवली गेली नाही. त्यामुळे या बदल्यांना स्थगिती देऊन अधिकार आपल्याकडे परत घेतल्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी स्पष्ट केले.