रेनकोट खरेदीवर उत्तर देताना मंत्र्यांची दमछाक
By admin | Published: July 21, 2016 04:30 AM2016-07-21T04:30:02+5:302016-07-21T04:30:02+5:30
राज्यातील आश्रमशाळंमधील आदिवासी मुलांसाठी रेनकोट खरेदीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला,
अतुल कुलकर्णी,
मुंबई- राज्यातील आश्रमशाळंमधील आदिवासी मुलांसाठी रेनकोट खरेदीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला,
या प्रकरणाची चौकशी एसआयटी किंवा एसीबीमार्फत करण्यात यावी, अशी मागणी करत विरोधकांनी विधानसभेत आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना चांगलेच अडचणीत आणले.
रेनकोट खरेदीची आदिवासी विभागातर्फे चौकशी सुरु आहे, पण ती मान्य नसेल तर उद्योग विभागातर्फे चौकशी करु, असे उत्तर सावरा यांनी दिले. पण त्याने समाधान न झालेल्या सदस्यांनी सावरा यांना चांगलेच अडचणीत आणले. तालिका अध्यक्ष असलम शेख विरोधी बाकावरील सदस्यांना प्रश्न विचारण्याची संधी देत होते.
जवळपास अर्धा तास प्रश्नांच्या फैरी त्यांच्यावर झडत होत्या. शेवटी भाजपा सदस्य योगेश सागर तालिका अध्यक्ष म्हणून आले आणि त्यांनी या लक्षवेधीवरील चर्चा संपविण्याचा प्रयत्न केला. खात्यातर्फे चौकशी सुरु आहे, असे सावरा यांनी सांगितले.
>रेनकोट खरेदीची निविदा : रेनकोट खरेदीची निविदा काढण्याचे, त्याच्या खरेदीचा प्रस्ताव बनविण्याचे, नंतर वाद निर्माण झाल्यानंतर या प्रकरणाला स्थगिती देण्याचे आणि नंतर सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याचे काम एकच आयुक्त कसे काय करु शकतात? असा प्रश्न दिलीप वळसे पाटील यांनी केला. मात्र एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर सावरा देऊ शकले नाहीत. सावरा यांच्या मदतीला गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आले पण सावरा यांना उत्तरे देता आली नाहीत.