मंत्रिपद सोडण्याची ज्येष्ठ मंत्र्यांची तयारी!
By admin | Published: April 6, 2017 05:19 AM2017-04-06T05:19:26+5:302017-04-06T05:19:26+5:30
मंत्रीपद सोडून पक्षसंघटनेत पूर्णवेळ काम करण्याची आपली तयारी असल्याचे एका ज्येष्ठ मंत्र्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितले
यदु जोशी,
मुंबई- शिवसेनेत मंत्रिपदाची खांदेपालट होईल, अशी चर्चा असतानाच मंत्रिपद सोडून पक्षसंघटनेत पूर्णवेळ काम करण्याची आपली तयारी असल्याचे एका ज्येष्ठ मंत्र्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितले असल्याची माहिती अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी आज दिली. अन्य काही मंत्रीही तोच कित्ता गिरवून ठाकरे यांना सर्वाधिकार देतील, अशी शक्यता आहे.
दीर्घकाळ पक्षसंघटनेत काम केलेल्या या मंत्र्यांबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुठली भूमिका घेतात या बाबत उत्सुकता आहे. शिवसेनेचे मंत्री, आमदारांची बैठक ठाकरे यांनी गुरुवारी सायंकाळी मातोश्रीवर बोलविली आहे. पक्षसंघटना तसेच मंत्रिमंडळातही काही बदल होतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
मंत्रीपदावर पाणी सोडण्याची तयारी एका ज्येष्ठ मंत्र्याने दाखविली असताना अन्य ज्येष्ठ मंत्री उद्याच्या बैठकीत तशीच आॅफर देऊन उद्धव यांना मंत्रिमंडळातील शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये खांदेपालट करण्याचे अधिकार देण्याची भूमिका घेतील, अशी शक्यता आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शब्द आमच्या पक्षात अंतिम आहे. त्यामुळे मंत्र्यांमध्ये कोणाला वगळायचे, कोणत्या राज्यमंत्र्यास कॅबिनेटची संधी द्यायची किंवा कोणत्या आमदारास मंत्रीपद द्यायचे हे ठरविता यावे म्हणून केवळ कॅबिनेटच नव्हे तर सर्व राज्यमंत्र्यांनीही त्यांच्याकडे देणे उचित ठरेल, अशी भावना शिवसेनेच्या एका आमदाराने व्यक्त केली. सुत्रांनुसार, सेनेच्या मंत्र्यांमध्ये फारतर एखाददोन मंत्र्यांना वगळले जाऊ शकते. अनेक वर्षे पक्षाची सेवा केलेल्या मंत्र्यांना काही आमदारांनी तक्रार केली म्हणून घरचा रस्ता दाखविणे हे त्यांच्या निष्ठेवर अन्याय केल्यासारखे होईल, असाही विचार मातोश्रीवर प्रबळ आहे.
सेनेचे पाचही कॅबिनेट मंत्री हे मुंबई-ठाण्याचे आहेत. त्यातील एखादे कॅबिनेट मंत्रीपद मराठवाड्याकडे जाऊ शकते. तसे झाले तर अर्जून खोतकर यांना संधी असेल. जळगावमध्ये राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना बळ देण्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली तर कॅबिनेट मंत्रीपदाची माळ पाटील यांच्या गळ्यात पडू शकते.
>यांची चर्चा
उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांच्यापैकी एक किंवा दोन जणांना पक्षसंघटनेत पाठविले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. हे चौघेही विधान परिषदेचे सदस्य आहेत. देसाई आणि सावंत यांचे मातोश्रीशी अतिशय चांगले संबंध आहेत. रामदास कदम यांची मंत्री म्हणून ही शेवटची इनिंग असेल आणि ते त्या नंतर पक्षसंघटनेच्या कामाला वाहून घेतील, असे सांगत त्यांचा बचाव केला जाऊ शकतो.