मंत्र्यांनी बोलताना संयम पाळावा, देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली राजधर्माची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 09:03 IST2025-03-20T09:00:48+5:302025-03-20T09:03:17+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड’ साेहळ्यात वाजपेयींनी दिलेल्या मंत्राची करून दिली आठवण; राजभवनमध्ये रंगला दिमाखदार कार्यक्रम; ‘मोस्ट पॉवरफुल पॉलिटिशियन’ पुरस्काराने मुख्यमंत्र्यांचा गौरव; अनेक मान्यवरांची मांदियाळी

मंत्र्यांनी बोलताना संयम पाळावा, देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली राजधर्माची आठवण
मुंबई : मंत्र्यांनी बोलताना संयम पाळला पाहिजे. आपल्या बोलण्यातून तेढ निर्माण होणार नाही, असा प्रयत्न केला पाहिजे, अशा कानपिचक्या देताना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी राजधर्म पाळण्याच्या दिलेल्या मंत्राची आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांना करून दिली. त्याचबरोबर आपण मुंबईत खूश आहोत, असे सांगून दिल्लीत जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ७५ वर्षांची वयाची सीमा स्वतः नरेंद्र मोदींजींनी ठरवली असली, तरी ती आम्हाला मान्य नाही, २०२९ साली नरेंद्र मोदीच पंतप्रधान असावेत, अशी आमची इच्छा असल्याचेही फडणवीस म्हणाले.
‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड २०२५’च्या कार्यक्रमात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली.
सरकारमधील काही जबाबदार व्यक्ती काही विशिष्ट समाजाविरोधात टोकाची भाषा वापरतात, त्यामुळे समाजात तेढ निर्माण होत आहे, याबाबत आपली भावना काय आहे ? असा प्रश्न जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारला. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना राजधर्माची आठवण करून दिली.
जेव्हा आपण मंत्री असतो, तेव्हा संयमानेच बोलले पाहिजे. मंत्री म्हणून आपली भूमिका आहे, ज्याचा उल्लेख कधीतरी अटलबिहारी वाजपेयींनी केला होता की, मंत्री म्हणून आपल्याला राजधर्म पाळायचा असतो, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, आपले विचार, आपल्या आवडी निवडी बाजूला ठेवून आपण संविधानाची शपथ घेतली आहे. संविधानाने कोणाही सोबत अन्याय न करता वागण्याची जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे. त्यामुळे मंत्र्यांनी बोलत असताना संयम पाळला पाहिजे, आपल्या बोलण्यातून तेढ निर्माण होणार नाही, असा प्रयत्न केला पाहिजे. कधी कधी तरुण मंत्री बोलून जातात, तेव्हा मी त्यांच्याशी संवाद करतो आणि सांगतो आता तुम्ही मंत्री आहात त्यामुळे तुम्ही संयम बाळगूनच बोलले पाहिजे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मी दिल्लीकडे डोळे लावून बसलेलो नाही
नरेंद्र मोदी लवकरच ७५ वर्षांचे होतील, ते जास्त काळ पंतप्रधान राहावेत अशी आपल्या पक्षाची इच्छा असेल यात शंका नाही. पण नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस, यात तुम्ही आपल्याला कुठे पाहता? असे विचारले असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पक्षाचा असा कार्यकर्ता आहे की, ज्याला तुम्ही जिथे टाकाल तिथे तो फीट आहे. आज तरी देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्रात जबाबदारी दिलेली आहे, त्यामुळे महाराष्ट्रात दिलेली जबाबदारी उत्तमपणे पार पाडण्याचा प्रयत्न मी करेन, मी दिल्लीकडे डोळे लावून बसलेलो नाही, मी मुंबईत अतिशय खूश आहे. दिल्लीच्या वातावरणापेक्षा मुंबईचे वातावरण उत्तम आहे आणि मुंबईत तुमच्यासारखे मित्र आहेत, त्यामुळे मी मुंबईतच राहणार आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.