मंत्र्यांचा ताफा आला, दुष्काळ बघून गेला...
By admin | Published: March 6, 2016 03:43 AM2016-03-06T03:43:25+5:302016-03-06T03:43:25+5:30
मंत्र्यांचा ताफा आला... वरवरची विचारपूस केली... आमचं ऐकायला आले आणि आम्हालाच विचारून गेले, काही दिलं नाही आणि काय देणार याचा थांगपत्ता लागू दिला नाही
प्रताप नलावडे, बीड
मंत्र्यांचा ताफा आला... वरवरची विचारपूस केली... आमचं ऐकायला आले आणि आम्हालाच विचारून गेले, काही दिलं नाही आणि काय देणार याचा थांगपत्ता लागू दिला नाही. धुरळा उडवत निघून गेलेल्या गाड्या बघण्यापलीकडे आमच्या पदरी काही पडले नाही, अशी जळजळीत प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली. जिल्ह्यातील प्रशासनाने जे जे दाखविले, ते ते पाहून मंत्र्यांचा ताफा आला तसा गेला.
शुक्रवारी दहा मंत्री जिल्ह्यात आले. तालुक्या-तालुक्यात गेले आणि त्यांनी दुष्काळाची पाहणी केली. ही पाहणी केली म्हणजे त्यांनी नेमके काय केले, हे विचारले तर शेतकऱ्यांसह अधिकारीही काळीवेळ बुचकुळ्यात पडतात. मंत्र्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने नियोजित ठिकाणी अधिकारी ठाण मांडून बसले होते. काही शेतकरी आणि लोकांना आवर्जून तेथे उपस्थित राहण्यासाठी आणले होते. शनिवारी मात्र पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ दिसत होती.
मंत्री आपल्या गावात येणार म्हटल्यावर भरमसाठ अपेक्षा ठेऊन असलेल्या शेतकऱ्यांच्या हातावर ‘तूरी’ देण्याचेच काम सरकारने केल्याच्या संतप्त भावना अंबाजोगाई तालुक्यातील शिरीष मुकडे या शेतकऱ्याने व्यक्त केल्या.
शासकीय पातळीवरुन झालेली कामे पाहण्यावरच या मंत्र्यांनी भर दिला. प्रशासन जे दाखविलं ते बघायचे आणि पुढे निघून जायचे, असेच चित्र होते. सामान्य शेतकऱ्याशी संवाद नाही आणि त्याच्या वेदना जाणून घेण्याची तळमळ नाही. गेली चार वर्षांपासून दुष्काळाच्या असह्य वेदना सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता या ‘पाहणी’ समारंभाची सवय झाली असल्याचेच त्यांच्याशी संवाद साधताना जाणवते.
> मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळावरील उपाययोजनांचा आढावा
विशाल सोनटक्के ल्ल उस्मानाबाद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी लातूर येथे विशेष बैठक घेऊन दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. शनिवारीही मुख्यमंत्री दुष्काळग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी आग्रही असल्याचे दिसून आले. फडणवीस यांनी मुंबईतून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून दुष्काळी उपाययोजनांना गती देण्याचे निर्देश दिले.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी उस्मानाबाद येथून दौरा सुरू केला होता. येडशी येथील ग्रामस्थांनी टँकरद्वारे सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार त्यांच्याकडे केली होती. यावर टँकरच्या फेऱ्या तातडीने वाढविण्याचे निर्देश देण्यात आले होते. प्रत्यक्षात शनिवारीही तेथे जैसे थे परिस्थिती असल्याचे दिसून आले.
लोहारा तालुक्यातील वडगाव (गांजा) येथे राज्यमंत्री राजे अंब्रीशराव अत्राम यांनी दौरा केला होता. हाताला काम नसल्याची तक्रार तेथील मजुरांनी मंत्र्यांकडे केली होती. मात्र शनिवारी या स्थितीत काहीही बदल झाला नसल्याचे सरपंच बबन फुलसुंदर यांनी सांगितले. याबाबत तहसीलदार ज्योती चौहान यांच्याशी संपर्क साधला असता लवकरच कामे सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. वडगाव (गांजा) येथेच चारा टंचाईचा मुद्दा पुढे आला होता. याबाबत विचारले असता सरपंचांशी बोलून प्रस्ताव मागविण्यात येत असून, त्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या.
गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दौऱ्याप्रसंगी फळबागांचे अनुदान मिळाले नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती. याबरोबरच शेततळ्याच्या मंजुरीचा मुद्दाही पुढे आला होता. याप्रकरणी शनिवारी वाशी येथील तहसीलदार सुरेंद्र डोके यांनी संबंधित कृषी सहाय्यकास नोटीस बजावली आहे. परंडा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली होती. शनिवारी रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. रोजगार हमी योजनेची कामे आणखी मोठ्या प्रमाणात करता येऊ शकतात. याबाबत तालुकानिहाय आढावा घेऊन कामांची संख्या वाढवावी. ज्या ठिकाणी मजुरांनी कामाची मागणी केली आहे, तेथे जाऊन लवकरात लवकर कामे सुरू करण्याबाबतची कार्यवाही सुरू करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी या बैठकीत दिले.
> दुष्काळी दौरे फक्त फोटो काढण्यापुरते - अशोक चव्हाणजळगाव : अधिवेशनापूर्वी सुरू केलेले मंत्रिमंडळाचे दुष्काळी दौरे फक्त फोटो काढून घेण्यासाठी व आम्ही काहीतरी करतोय, हे दाखविण्यासाठी आहेत. सकाळी दौरा आणि सायंकाळी पार्टी, असे या दौऱ्यांचे चव्हाण यांनी वर्णन केले. रोहित वेमुला, कन्हैया कुमार यांच्याबाबत जे घडले. तसेच देशात सध्या जे घडत आहे, ते घातक आहे. जे विचार मांडतात, सरकारच्या विरोधात बोलतात त्यांची मुस्कटदाबी केली जाते. विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना देशद्रोही ठरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका काँग़्रेसतर्फे स्वबळावर लढविल्या जातील. जिल्ह्यांची स्थिती लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसशी प्रासंगिक करार केले जातील. पण राष्ट्रवादी काँग्रेस शब्द पाळत नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत निवडणूक लढणार नाही. तसेच काँग्रेसमध्ये पुनर्बांधणीच्या दृष्टीने राज्यभरात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात संबंधित जिल्ह्याबाहेरील प्रभारी नियुक्त केला जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात दुष्काळ, पाणीटंचाई व शेतकरी आत्महत्या आदी मुद्यांवर सरकारला जाब विचारण्यात येईल, असेही ते म्हणाले.
>> राज्य सरकार टंचाईबाबत गंभीर नाही - विखे पाटील
धुळे : राज्यात दुष्काळासह टंचाईचा प्रश्न गंभीर आहे. परंतु याचे राज्य सरकारला गांभीर्य नसून आजाराचे निदानच सरकारला होत नसताना उपचार सुरू असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुपारी येथे पत्रकार परिषदेत केली. राज्यात वर्षभरात ३२५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात कोण मदतीस पात्र, अपात्र असा घोळ सरकारचा चालला आहे. थोडी फार चाड असेल तर सरकारने कर्जमाफीची घोषणा करावी. त्या शिवाय पर्याय नसल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले. धुळे जिल्ह्यातील दुष्काळी व टंचाई स्थिती जाणून घेण्यासाठी शनिवारी त्यांनी शिंदखेडा शहरासह तालुक्यातील हातनूर, धुळे तालुक्यातील सोनगीर, बेंद्रेपाडा येथे भेट देत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जलयुक्त शिवार अभियान योजनेंतर्गत शिंदखेडा तालुक्यात झालेल्या कामांचीही त्यांनी पाहणी केली.
>> पालं उठून गेलेला जसा उदास उरूस!
दत्ता थोरे ल्ल लातूर
लातूरला शुक्रवारी अक्षरश: लगीनघाई होती. सर्वच तालुक्यात मंत्री होते. एकेक मंत्री चार-पाच गावांत जाणार होते. त्यांच्या मागेपुढे करणाऱ्या कार्यकर्ते-अधिकाऱ्यांची लगबग सुरू होती. सत्तापक्षाचे स्थानिक भोई पालखीला खांदे देऊन होते. विरोधक कुठे निदर्शने, कुठे काळे झेंडे घेऊन कामात गुंतले होते. संघटनांचे पदाधिकारी निवेदने घेऊन मंत्र्यांना विनवण्या करीत होते. शनिवारी ही सारी माणसे रिकामी झाली. जणू जत्रा एका दिवसात संपली. अन् जत्रेतील पालं उठून गेल्यावर उदास झालेल्या उरसासारखी लातूरची अवस्था झाली. मागे होते ते फक्त चर्चेचे गुऱ्हाळ.
‘लोकमत’ने मंत्रिमंडळ परतीनंतरच्या दिवसाचा शनिवारी कानोसा घेतला. दिवसभरात शासकीय कार्यालयांतही कुणी अधिकारी किंवा नेते, कार्यकर्ते फारसे फिरकले नाही. ज्या-ज्या गावांना मंत्र्यांनी भेटी दिल्या, त्या गावातील या दौऱ्याच्या आठवणी उगाळल्या जात होत्या. जळकोट पंचायत समितीत जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांच्या विरुद्ध निदर्शने करताना सेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांत झटापट झाली होती. शनिवारी मात्र पंचायत समिती अगदीच निवांत होती.
निलंगा तालुक्यात स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे होते. त्यामुळे सर्वाधिक धावपळ तिथे होती. औसा तालुक्यातील उजनी येथे आत्महत्या करणाऱ्या संजय जाधव या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि दोन लाखांचा निधी शिवसेनेच्या वतीने दिला होता.
शुक्रवारी शासकीय विश्रामगृह हे भरगच्च होते. २७ मंत्री, लातूर, बीड उस्मानाबादसह औरंगाबाद विभागीय कार्यालय आणि मंत्रालयाचे अधिकारी होते. दौरा झाल्यानंतर महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी लातुरातच मुक्काम केला. सकाळी नऊ वाजता त्यांनी लातूर सोडले.