उल्हासनगरात पालकमंत्री हरले, राज्यमंत्री जिंकले!

By admin | Published: April 6, 2017 03:23 AM2017-04-06T03:23:27+5:302017-04-06T03:23:27+5:30

भाजपाला ठाणे जिल्ह्यात शिवसेनेच्या ‘अरे’ ला ‘कारे’ करणारा नेता मिळाल्याचे उल्हासनगरमधील महापौरपदाच्या निवडणुकीतून स्पष्ट झाले.

Ministers of the state, the state minister wins the Ulhasnagar! | उल्हासनगरात पालकमंत्री हरले, राज्यमंत्री जिंकले!

उल्हासनगरात पालकमंत्री हरले, राज्यमंत्री जिंकले!

Next

सदानंद नाईक,

उल्हासनगर- केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र; तर कल्याण-डोंबिवलीत रवींद्र अशी घोषणा देत तेथील राजकारणात चमकलेले मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने भाजपाला ठाणे जिल्ह्यात शिवसेनेच्या ‘अरे’ ला ‘कारे’ करणारा नेता मिळाल्याचे उल्हासनगरमधील महापौरपदाच्या निवडणुकीतून स्पष्ट झाले.
कल्याण-डोंबिवली महापालिका, लोकसभा, विधानसभा निवडणुका, ठाणे महापालिका, विधान परिषद निवडणुका या सर्वांवर आपला एकहाती-एकछत्री अंमल प्रस्थापित केल्याने ठाणे जिल्ह्याच्या राजकारणातील अनभिषिक्त सम्राट अशीच एकनाथ शिंदे यांची ख्याती निर्माण झाली होती. निवडून आलेल्या नेत्यांतील अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व असा त्यांचा गौरव होत असल्याने शिवसेना सत्तेत सहभागी होण्यापूर्वी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद त्यांच्या गळ््यात पडले. आताही वाटाघाटी करण्यासाठी त्यांचाच आधार शिवसेनेत घेतला गेला. तसेच मंत्रिपदाच्या फेरबदलात एकमुखी अभय मिळालेले नेते म्हणून त्यांचा गौरव झाला. त्यामुळे त्यांनी राजकारणात एखादी खेळी खेळायची ठरवली तर ती हमखास यशस्वी होईल, असे आजवर मानले जात होते. पण उल्हासनगरच्या राजकारणाने या समजाला धक्का दिला.
उल्हासनगर निवडणुकीपूर्वी पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी यांना त्यांच्या टीमसह भाजपात घेण्याची खेळी रवींद्र चव्हाण यांनी खेळली. भाजपातील काही गटांचा विरोध मोडून काढत कलानी यांना पक्षात घेतले. त्यांचा गट वेगळा ठेवण्याचे मनसुबे यशस्वी होऊ दिले नाहीत, इतके की दीर्घकाळानंतर कलानी हे उल्हासनगरच्या राजकारणातील साम्राज्य या निवडणुकीच्या रूपाने भाजपाच्या पंखाखाली आले. पालिका निवडणूक निकालानंतर त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यावर साई पक्षाला किंगमेकर होण्याची संधी मिळाली. शिवसेनेने पाच पक्षांना एकत्र आणून साई पक्ष फोडण्याच्या हालचाली सुरू केल्या.त्यासाठी आजवरचा मराठी बाणा बाजूला ठेवत सिंधी कार्ड खेळत साई पक्षाला महापौरपदाची आॅफर दिली. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आलेल्या भाजपाच्या हातची सत्ता जाईल, अशी स्थिती निर्माण झाली. साई पक्षाची मान्यता रद्द करण्याची खेळी खेळली गेली. पण त्या पक्षाचा पाठिंबा मिळवत, तो पक्ष अखंड ठेवत, नगरसेवकांना पहाऱ्यात ठेवत चव्हाण यांनी उल्हासनगरमध्ये भाजपाची सत्ता आणली. शेवटच्या प्रयत्नात ओमी कलानी गटाला फूस लावत त्यांना सामूहिक राजीनाम्याचा पवित्रा घेण्यासाठी उद्युक्त केले गेले. त्यातून आयत्यावेळी सभागृहात साई पक्षाचे सहा, तर भाजपाचे सात ते आठ नगरसेवक फुटतील, अशी चर्चा सुरू झाली. मात्र सभागृहातील आसन व्यवस्थाच बदलण्यात आल्याने शिवसेनेने ठिय्या दिला. तोवर त्यांच्या तंबूत असलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक जेसवानी गैरहजर राहिल्याने शिवसेनेला धक्का बसला. साईचेफुटीर नगरसेवक आणि आपल्या असंतुष्ट नगरसेवकांवर भाजपाने पाळत ठेवली. ते उठले, तरी त्यांना त्वरित बसण्यास सांगण्यात येत होते. तसेच बाहेर जाण्यास मनाई केली होती. प्रेक्षागृहातून राज्यमंत्री चव्हाण इशारे करत परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.
>भाजपा-सेना कार्यकर्ते आमनेसामने
ज्यावेळी महापालिका सभागृहात आसन व्यवस्था आणि साई पक्षाच्या मान्यतेवरून शिवसेनेसह मित्रपक्ष ठिय्या धरत धिंगाणा घालत होते, त्याचवेळी प्रेक्षक गॅलरीत शिवसेना-भाजपाचे कार्यकते आमने-सामने येत घोषणाबाजी करत होते.
‘शिवसेना झिंदाबाद ’ अशी घोषणा होताच भाजपा कार्यकर्त्यांकडून ‘जय श्रीराम’, ‘मोदी मोदी’च्या घोषणांनी त्याला प्रत्त्युत्तर दिले जात होते. भाजपातर्फे प्रेक्षक गॅलरीत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपील पाटील, शहर अध्यक्ष कुमार आयलानी होते. पण शिवसेनेचा एकही मोठा नेता उपस्थित नव्हता.
>सेनेचा रडीचा डाव : चव्हाण
भाजपा आणि साई पक्षाकडे स्पष्ट बहुमत असतानाही सत्तेसाठी शिवेसेनेने फोडाफोडीचे राजकारण केले. महापौर निवडणुकीदरम्यानही बहुमताचा आदर न करता त्यांनी धिंगाणा घातला. त्यांनी घटनेचा आदर करायला हवा. पण शिवसेनेने हसत पराभव न स्वीकारता रडीचा डाव खेळला, अशी टीका राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली. उल्हासनगरच्या विकासासाठी आम्ही कट्टीबद्ध असून आता त्यांचा भ्रमनिरास होणार नाही, अशा विश्वासही त्यांनी दिला.
शिवसेनेनेही सोबत यावे : कुमार आयलानी
शहरवासीयांनी भाजपा आणि साई पक्षावर विश्वास दाखविला आहे. शहरविकास आराखडा, रस्ते, डम्पिंग, भुयारी गटार योजना, रखडलेली पाणीयोजना मार्गी लावून विकास साधणार असल्याचे कुमार आयलानी यांनी सांगितले. शहराच्या विकासासाठी शिवसेनेनेही सोबत येण्याची गरज आहे. ओमी कलानी यांच्या टीममुळेच उल्हासनगरात भाजपची सत्ता आली असून ही टीम नाराज असल्याची अफवा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आम्हाला मानाचे स्थान : ओमी कलानी
भाजपने ओमी टीमला महापौरपदाचा शब्द दिला होता. पण तो आत्ता पाळला न गेल्याने टीमचे सदस्य नाराज होते. मात्र सव्वा वर्षानंतर महापौरपद देण्याचा करार झाला आहे. स्थायी समितीचे सभापतीपद साई पक्षाला दिले आहे. असे असले, तरी भाजपात ओमी टीमला मानाचे स्थान आहे. शहराच्या विकासासाठी आम्ही आमची पदाची मागणी मागे घेतली आहे, असे ओमी कलानी यांनी सांगितले.
लोकशाहीचा गळा घोटला
: राजेंद्र चौधरी
भाजपाने सत्तेच्या जोरावर लोकशाहीचा गळा घोटला आहे. साई पक्षाच्या गटाची मान्यता आधी रद्द केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या गटाला मान्यता कशी मिळते, हा खरा प्रश्न असून याविरोधात शिवसेना न्यायालयात गेली आहे, असे शिवसेनेचे शहप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सांगितले. १२ एप्रिलला न्यायालयात सुनावणी झाल्यावर भाजपाचे पितळ उघडे पडेल. साई पक्षाच्या गटाला मान्यता मिळाली नसती, तर पालिकेवर शिवसेनेचा महापौर आणि रिपाइंच्या आठवले गटाचा उपमहापौर निवडून आला असता, असा दावाही त्यांनी केला.

Web Title: Ministers of the state, the state minister wins the Ulhasnagar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.