निलम गोऱ्हे यांच्या मार्गात मंत्र्याचा अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 06:19 AM2018-12-01T06:19:41+5:302018-12-01T06:20:00+5:30
उपसभापती निवड
- अतुल कुलकर्णी
मुंबई : शिवसेनेतील अंतर्गत कलहामुळे विधान परिषद उपसभापतीपदाची निवडणूक झालीच नाही. त्यामुळे आ. निलम गोऱ्हे यांचा हिरमोेड झालाच, शिवाय शिवसेनेचा वाद काँग्रेस राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडला.
माणिकराव ठाकरे यांची मुदत संपल्यापासून हे पद रिक्त आहे. विधानसभा उपाध्यक्ष पद आणि विधान परिषदेच्या उपसभापतींची निवड हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी होईल, असे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार उपाध्यक्ष पदी शिवसेनेचे विजय औटी यांची बिनविरोध निवड झाली; मात्र राजकीय कुरघोडींमुळे उपसभापतीची निवड लांबणीवर पडली.
गोर्हे यांची बिनविरोध निवड व्हावी, यासाठी मुख्यमंत्री शिष्टाई करत होते. आज त्यांनी सभापती रामराजे निंबाळकर यांचीही भेट घेतली. मात्र, सेनेकडून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार अथवा अजित पवार यांच्याशी कुणीही संपर्क साधला नसल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता, काँग्रेसशी बोलावे लागेल असे पवार यांनी सांगितल्याचे समजते. काँग्रेसतर्फे इच्छूक शरद रणपिसे यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. मात्र, कोणताही मार्ग न निघाल्याने निवड लांबणीवर पडली. आता पुढच्या अधिवेशनापर्यंत हे पद रिक्तच राहणार आहे.
निवडणूक जाहीर करण्याचा अधिकार सभापतींचा असतो. काँग्रेस, राष्ट्रवादी ३४ आणि भाजपा शिवसेनेचे संख्याबळ ३४ आहे. अपक्ष ६ आमदारांसह १० अन्य सदस्य आहेत. त्यातील ४ मतांची बेगमी मुख्यमंत्र्यांनी केली होती; पण शिवसेनेचे एक ज्येष्ठ मंत्री व एका ज्येष्ठ सदस्यास निलम गोर्हे उपसभापती होऊ नयेत असे वाटत होते. त्यांनीच गणित बिघडवल्याचे समजते.