मंत्र्यांच्या विधानांमुळे उडाला आंदोलनाचा भडका; शरद पवार यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 01:31 AM2018-07-25T01:31:05+5:302018-07-25T01:32:12+5:30
मराठा समाजाला शांतता राखण्याचे आवाहन
नवी दिल्ली : मराठा आरक्षणावरून सुरू झालेल्या आंदोलनाच्या परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ पावले उचलण्याची गरज होती. परंतु विठ्ठल पूजेच्या निमित्ताने वारकऱ्यांना त्रास होईल, अशी साप सोडण्याची विधाने त्यांनी केली. त्यात चंद्रकांत पाटील यांच्या बेजबाबदार विधानांची भर पडली व त्यामुळे बहुसंख्य घटकांचा संताप अनावर झाला आहे. परिस्थिती चिघळण्यास ही मंडळीच जबाबदार आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार केला.
रात्री उशीरा जारी केलेल्या निवेदनात पवार म्हणाले की, मराठा समाजातील वंचित तरुणांनी शांततेच्या मागार्ने आतापर्यंत त्यांच्या आरक्षणासह इतर मागण्या मांडल्या व कधीही कायदा सुव्यवस्थेला धक्का पोहोचू दिला नाही. या अस्वस्थतेची दखल घेतली जात नसल्याने काहींनी आत्महत्येचा मार्गही स्वीकारला. परंतु राज्य सरकारने याची उचित दखल न घेतल्याने आता उद्रेकाची स्थिती निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री किंवा त्यांचे मंत्री या विषयाचे गांभीर्य समजण्याऐवजी चिथावणीदायक विधाने करताना आढळत आहेत. ही बाबही अतिशय खेदजनक आहे. ही परिस्थिती वेळीच आटोक्यात राखण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने आंदोलनात सहभागी महत्वाच्या घटकांना त्वरित बोलावून त्यांच्याशी संवाद साधावा व यातून मार्ग काढण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे आवाहनही पवार यांनी केले.
झळ बसणार नाही याची खबरदारी घ्या
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टाळणे व सर्वसामान्यांना आंदोलनाची झळ बसणार नाही याची खबरदारीही आंदोलन करणाºयांनी घ्यावी आणि आतापर्यंत या आंदोलनाला असलेली सहानभूती टिकवून ठेवाव, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.