स्टिंगच्या मुळाशी मंत्रिपद!

By admin | Published: June 27, 2015 02:25 AM2015-06-27T02:25:54+5:302015-06-27T02:25:54+5:30

मुंबईतील भाजपाचे आमदार राज पुरोहित यांचे स्टिंग आॅपरेशन नेमके कशासाठी झाले याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे. राज्य मंत्रिमंडळातील संभाव्य वर्णी तर या स्टिंगच्या मुळाशी नाही

Ministers of the sting! | स्टिंगच्या मुळाशी मंत्रिपद!

स्टिंगच्या मुळाशी मंत्रिपद!

Next

मुंबई : मुंबईतील भाजपाचे आमदार राज पुरोहित यांचे स्टिंग आॅपरेशन नेमके कशासाठी झाले याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे. राज्य मंत्रिमंडळातील संभाव्य वर्णी तर या स्टिंगच्या मुळाशी नाही ना,अशी शंका घेतली जात आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार अशी चर्चा आहे. भाजपाकडून मुंबईतील विनोद तावडे, प्रकाश मेहता हे कॅबिनेट तर विद्या ठाकूर या राज्यमंत्री असे तिघे आधीच मंत्रिमंडळात आहेत. आता संभाव्य नावांमध्ये राज पुरोहित, मंगलप्रभात लोढा हे ज्येष्ठ आमदार आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार या तिघांपैकी कोणाला संधी मिळणार या बाबत उत्सुकता आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता असतानाच पुरोहित यांचे स्टिंग केले गेल्याने या स्टिंगचा संबंध हा विस्ताराशी जोडला जात आहे. पुरोहित यांनी स्टिंगमध्ये जी विधाने केली आहेत त्यात लोढा हे भाजपा व संघाला पैसा पुरवितात,असा गंभीर आरोप आहे. पुरोहितांकडून लोढांबद्दल वदवून घेत एकाच दगडात दोन पक्षी तर मारण्याचा हेतू नव्हता ना, असा संशय घेतला जात आहे. दुसरीकडे असेही म्हटले जाते की मुंबईतून कुण्यातरी एका हिंदी भाषकाची वर्णी मंत्रिमंडळात लागली असती. एकाने दुसऱ्याचा पत्ता कापण्याच्या हेतूनेही हे झाले असण्याची शक्यता आहे. पुरोहित यांनी अत्यंत वादग्रस्त विधाने केल्याने आता त्यांचे मंत्रिपद तर दूरच पण पक्षातील स्थानच डळमळीत झाले आहे.
पुरोहित हे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्ती मानले जातात. त्यांना मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदावरून हटवून नितीन गडकरी समर्थक मधु चव्हाण यांची वर्णी लावण्यात आली तेव्हा मुंडे संतप्त झाले होते.याचवरून त्यांनी पक्ष बंडाचे निशाण फडकविल्यानंतर पुरोहित यांना अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले होते.
राज पुरोहित यांचे स्टिंग आॅपरेशन कुण्या वृत्तवाहिनीने केले नाही. स्टिंगची व्हीडीओ असलेला पेनड्राईव्ह काही वृत्तवाहिन्यांकडे पोहोचविण्यात आला. त्यातील एका चॅनेलने स्टिंग आॅपरेशन दाखविले. याचा अर्थ स्टिंगचा निखळ हेतू हा त्यातून बातमी निर्माण करण्याचा नक्कीच नव्हता तर स्टिंगमधून राज पुरोहित यांना अडचणीत आणण्याचा होता हे स्पष्ट होते. मुंबई भाजपातील अंतर्गत सुंदोपसंदी आणि महत्त्वाकांक्षी राजकारणातून हे स्टिंग झाल्याची चर्चा रंगली मात्र रंगली आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Ministers of the sting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.