जालन्यातील भाग्यनगरच्या भाग्यात आजही मंत्रीपद
By रवींद्र देशमुख | Published: January 4, 2020 05:10 PM2020-01-04T17:10:22+5:302020-01-04T17:13:42+5:30
युतीच्या काळात अर्जुन खोतकर यांना मंत्रीपद मिळाले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात त्यांच्याकडे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी होती. खोतकर यांच्या रुपाने जालन्यालाच नव्हे तर भाग्यनगरला मंत्रीपद मिळाले होते.
- रवींद्र देशमुख
मुंबई - महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त लागला आहे. मंत्र्यांचा शपथविधी देखील उरकला असून जालना जिल्ह्याला राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांच्या रुपाने मंत्रीपद मिळाले आहे. टोपे यांची मंत्रीपदी वर्णी लागल्याने जालना शहरातील भाग्यनगरमधील मंत्रीपदाची परंपरा कायम राहिली आहे.
राजेश टोपे यांचे जालना शहरातील भाग्यनगरमध्ये निवासस्थान आहे. राज्यात युती सरकार येण्यापूर्वीच्या आघाडी सरकारमध्ये राजेश टोपे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री होते. 2001 पासून ते मंत्रीपदी आहेत. 2014 मध्ये राष्ट्रवादीला विरोधात बसावे लागले. त्यानंतर शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची मंत्रीपदी वर्णी लागली होती. खोतकर यांचे निवासस्थान देखील भाग्यनगरमध्येच आहे. मंत्री टोपे यांच्या बंगल्यापासून थोड्याच अंतरावर खोतकर यांचे निवासस्थान आहे.
युतीच्या काळात अर्जुन खोतकर यांना मंत्रीपद मिळाले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात त्यांच्याकडे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी होती. खोतकर यांच्या रुपाने जालन्यालाच नव्हे तर भाग्यनगरला मंत्रीपद मिळाले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत खोतकर यांचा पराभव झाला असला तरी शिवसेना पक्ष सत्तेत आला आहे. तर शिवसेनेसोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस देखील आहे.
राष्ट्रवादीकडून राजेश टोपे यांची पुन्हा एकदा मंत्रीपदी निवड झाली आहे. त्यामुळे भाग्यनगरला मंत्रीपद मिळण्याची परंपरा कायम राहिली आहे. टोपे यांचे यांचं खातं अद्याप निश्चित झालं नसल तरी त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे भाग्यनगरमध्ये पुन्हा एकदा वर्दळ वाढण्यास सुरूवात झाली आहे.