विधिमंडळ अधिवेशनाच्या स्वागतासाठी मंत्रालय सज्ज; फुलांच्या बागेने परिसराचे सुशोभीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 01:46 AM2018-11-18T01:46:58+5:302018-11-18T01:47:14+5:30
अनेक वर्षांनंतर यंदा मुंबईत महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनात उपस्थित राहणाऱ्या लोकप्रतिनिधींचे स्वागत मात्र येथील फुलांची बाग करणार आहे.
मुंबई : अनेक वर्षांनंतर यंदा मुंबईत महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनात उपस्थित राहणाऱ्या लोकप्रतिनिधींचे स्वागत मात्र येथील फुलांची बाग करणार आहे. मंत्रालयाजवळील परिसरात पाच हजारांपेक्षा अधिक फुलझाडे व शोभेच्या झाडांची रोपे लावून पालिकेने परिसर सुशोभित केला आहे. मोठ्या झाडांनाही रंगरंगोटी करण्यात येणार आहे.
१९ नोव्हेंबरपासून विधिमंडळाचे अधिवेशन होत आहे. अधिवेशनाला येणाºया लोकप्रतिनिधींच्या स्वागतासाठी मंत्रालयाजवळील परिसरातील मादाम कामा मार्ग, बॅ. रजनी पटेल मार्ग, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, फ्री प्रेस जनरल मार्ग इत्यादी मार्गांच्या दुभाजकांमध्ये व जंक्शनच्या जागेत हंगामी फुलझाडांची व शोभेच्या झाडांची सुमारे पाच हजार रोपे लावली आहेत. विशेष म्हणजे, ही रोपे नर्सरीमध्येच तयार केली आहेत. यासाठी उद्यान विभागातील माळी, संबंधित कर्मचारी गेले दोन महिने रोपांची रुजवण, निगा राखण्याचे काम करीत आहेत.
झाडांमध्ये सदाफुली, झिनिया, पिटुनिया, डायांथस, सिलोशिया प्रकारातील झाडे आहेत. या झाडांची व शोभेच्या झाडांच्या रोपट्यांची निगा राखण्याचे कामही पालिकेच्याच उद्यान विभागामार्फत केले जाईल, असे जाणार असल्याची माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.