मंत्रालयातील बांधकाम घोटाळ्यांची चौकशी; कामे न करताच लाखो रुपयांची बिले काढल्याची तक्रार
By यदू जोशी | Published: August 3, 2018 02:08 AM2018-08-03T02:08:57+5:302018-08-03T02:09:08+5:30
मंत्रालय आणि मंत्रालयाच्या आवारात सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या कामांमध्ये झालेल्या कथित घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी नाशिक प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे.
मुंबई : मंत्रालय आणि मंत्रालयाच्या आवारात सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या कामांमध्ये झालेल्या कथित घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी नाशिक प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे.
कामे न करताच लाखो रुपयांची बिले काढण्यात आल्याच्या एकूण सात तक्रारी भाजपाचे तुमसर (जि. भंडारा) येथील आमदार चरण वाघमारे यांनी केल्यानंतर त्यांची चौकशी करण्यासाठी ही समिती नेमण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंडळाचे (मुंबई) अधीक्षक अभियंता तसेच सार्वजनिक बांधकाम दक्षता पथक मंडळ; मुंबईचे अधीक्षक अभियंता हे या समितीचे अन्य दोन सदस्य असतील.
मंत्रालयात पहिल्या माळ्यापासून सातव्या माळ्यापर्यंत साईनेज बोर्ड लावण्याचे काम न करताच ते केल्याचे दाखवून २६ लाख ५० हजार रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार करण्यात आला. मंत्रालय परिसरात ढिगारे हटविले आणि टॉयलेट ब्लॉकचे नूतनीकरण केल्याचे कागदोपत्री दाखवून ३४ लाखांचा अपहार केला. टाकाऊ वस्तूचे ढिगारे उपसण्यासाठी मजूर लावल्याचे दाखवून २०.५२ लाख रुपये लाटले. प्रधान सचिवांच्या दालनात नूतनीकरणाचे काम न करता ४६ लाख रुपयांचा अपहार करण्यात आला.टाईल्सचे काम कागदोपत्री दाखवून २५ लाख रुपयांचा घोटाळा करण्यात आला, आदी सहा तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यातील काही प्रकरणांमध्ये आधीच विविध अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू केली होती. तथापि, आता सर्व तक्रारींची एकत्रित चौकशी करण्याची भूमिका सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली असून चौकशी समितीला दोन महिन्यांत अहवाल देण्यास सांगितले आहे. हे सगळे घोटाळे विद्यमान युती सरकारच्या काळात झालेले आहेत.
तक्रारींतील धक्कादायक बाबी
- साफसफाईच्या कामासाठी मंत्रालयात १७ आॅगस्ट २०१५ या एकाच दिवशी ८३० मजूर कामावर होते असे दाखविण्यात आले.
- विभागाच्या प्रधान सचिवांच्या दालनाच्या नूतनीकरणातही घोटाळे
- या दालनात ९ लाख रुपये किमतीचे सोनेरी वॉलपेपर लावण्यात आले