सायकल चोरणाऱ्या अल्पवयीन आरोपीला अटक, दहा सायकली हस्तगत
By admin | Published: July 12, 2017 08:59 PM2017-07-12T20:59:19+5:302017-07-12T20:59:19+5:30
गिअरच्या सायकली चोरुन त्याची विक्री करुन त्या पैशांमधून मौजमजा करणाऱ्या एका १५ वर्षीय मुलाला वर्तकनगर पोलिसांनी रंगेहाथ अटक
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 12 - गिअरच्या सायकली चोरुन त्याची विक्री करुन त्या पैशांमधून मौजमजा करणाऱ्या एका १५ वर्षीय मुलाला वर्तकनगर पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. त्याच्याकडून ९६ हजारांच्या दहा सायकली जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
यशोधननगर येथील आई माता मंदिराजवळ एक अल्पवयीन मुलगा सायकलची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे त्याला १० जुलै रोजी ताब्यात घेण्यात आले. त्याला विश्वासात घेतल्यानंतर त्याने ती सायकल चोरीची असल्याची कबूली दिली. सुरुवातीला त्याने चार महागडया सायकली काढून दिल्या. त्याच्याकडे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर आव्हाड, शोध पथकाचे हवालदार माणिक आहेर, भागवत दहिफळे, बशीर तडवी, अभिषेक सावंत आणि संदीप ठाणगे आदींनी केलेल्या सखोल चौकशीत आणखी सहा सायकलीही त्याने विकल्याचे सांगितले.
या सायकली चोरल्यानंतर तो त्या २०० ते ३०० रुपयांमध्ये विक्री करीत होता. महागडया सायकली चालविण्याचे आकर्षण आणि सायकल विक्रीच्या पैशाांमधून मौजमजा करण्यासाठी आपण त्या चोरल्याची त्याने कबूली दिली. चोरीतील सायकलींपैकी काही २१ गिअरच्याही आहेत. त्याचे वडील बस चालक तर आई नोकरी करते. दोघेही घरात नसतांना तो हे ‘उद्योग’ करायचा. आपल्या मुलाचे हे कारनामे समजल्यानंतर त्याच्या पालकांनाही धक्का बसला. चांगल्या वर्तणूकीच्या हमीवर बाल न्यायालयाने त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्याचे आदेश पोलिसांना दिले.