अल्पवयीन मुलाची प्रेमसंबंधातून हत्या

By admin | Published: July 21, 2016 05:42 AM2016-07-21T05:42:48+5:302016-07-21T05:42:48+5:30

बहिणीच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाल्याने संतापलेल्या भावाने तिच्या प्रियकराला कुटुंबासह बळजबरीने आपल्या घरी नेऊन मारहाण केल्याने त्यात मुलाचा मृत्यू झाला

Minor boy murdered with love | अल्पवयीन मुलाची प्रेमसंबंधातून हत्या

अल्पवयीन मुलाची प्रेमसंबंधातून हत्या

Next


नवी मुंबई : बहिणीच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाल्याने संतापलेल्या भावाने तिच्या प्रियकराला कुटुंबासह बळजबरीने आपल्या घरी नेऊन मारहाण केल्याने त्यात मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नेरूळमध्ये घडली आहे. स्वप्निल सोनावणे (१५) असे या मुलाचे नाव आहे.
या प्रकरणी राजेंद्र परशुराम नाईक (५०), मालती राजेंद्र नाईक (४५), सागर राजेंद्र नाईक (२५), साजेश राजेंद्र नाईक (२१), आशीष बाबूराव ठाकूर (२३), दुर्गेश विलास पाटील (२२), समीर मुजीबत शेख (२३) यांना नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी, हत्या, अपहरण असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नेरूळ सेक्टर १३ मधील एसबीआय वसाहतीत राहणाऱ्या स्वप्निल याचे दारावे गावातील एका १४ वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध होते. ते दोघेही लहानपणापासून एकाच शाळेत शिकत होते व ते नुकतेच दहावी उत्तीर्ण झाले होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती मुलीचा भाऊ सागर राजेंद्र नाईक (२५) याला मिळाली होती. सोमवारी रात्री त्याने मित्रांच्या मदतीने स्वप्निलला वसाहतीबाहेर बोलावले आणि रिक्षातून दूर नेऊन धमकावले होते.
पुन्हा दुसऱ्या दिवशी मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास काही तरुणांनी घरी येऊन स्वप्निल व त्याच्या लहान बहिणीला धमकावले. हे कळताच स्वप्निलचे वडील घरी आले असता, त्याठिकाणी सागर हा त्याच्या साथीदारांसह होता. त्याने आधी स्वप्निलच्या संपूर्ण कुटुंबाला इमारतीच्या छतावर नेऊन खाली टाकण्याची धमकी दिली. नंतर ‘घरी येऊन आई-वडिलांची माफी मागितली, तरच तुमची सुटका होईल,’ असे धमकावले आणि त्यांना बळजबरीने दारावे गाव येथे घेऊन गेला.
त्याच्या घराजवळ आधीच २५ ते ३० जणांचा जमाव जमलेला होता. तेथे गेल्यावर सागरने स्वप्निलला मारहाण केली. भीतिपोटी स्वप्निल व त्याचे आई-वडील पळू लागले असता, जमावाने पाठलाग करून तिघांनाही जबर मारहाण केली. या मारहाणीत स्वप्निलच्या डोक्याला व छातीवर गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला उपचारासाठी डी. वाय. पाटील रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (प्रतिनिधी)
>पोलिसांकडून दुर्लक्ष
सागरने धमकावल्याची तक्रार घेऊन
नेरूळ पोलीस ठाण्यात गेलो असता,
पोलीस उपनिरीक्षक सोनाली राजगुरू
यांनी, तुम्हाला ‘सैराट’ करायचे आहे का, अशी भीती दाखवत तक्रार न घेता परत पाठवले, असे सांगत स्वप्निलचे वडील शहाजी सोनावणे यांनी पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे आमच्या मुलाचा जीव गेल्याचा आरोप केला आहे.
दोघा पोलिसांचे निलंबन
स्वप्निलच्या कुटुंबीयांच्या आरोपांची दखल घेत, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी प्रकरणाची चौकशी सुरू करत पोलीस उपनिरीक्षक सोनाली राजगुरू व योगेश माने यांना निलंबित केले आहे.

Web Title: Minor boy murdered with love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.