अल्पवयीन मुले अमली पदार्थांच्या आहारी
By admin | Published: September 19, 2016 01:49 AM2016-09-19T01:49:49+5:302016-09-19T01:49:49+5:30
स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नवी मुंबईमध्ये उडता पंजाबची पुनरावृत्ती होऊ लागली आहे.
नामदेव मोरे,
नवी मुंबई- स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नवी मुंबईमध्ये उडता पंजाबची पुनरावृत्ती होऊ लागली आहे. १२ ते १५ वर्षांची मुलेही अमलीपदार्थांच्या आहारी जावू लागली आहेत. सीवूडमधील महात्मा फुले उद्यानामध्ये अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांचा अड्डा तयार झाला असून गांजासह वाहन, प्लायवूड उद्योगात वापरण्यात येणाऱ्या स्पेब ७ चा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे.
सीवूड सेक्टर ४० मध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी महापालिकेने लाखो रूपये खर्च करून महात्मा जोतीबा फुले उद्यानाची निर्मीती केली आहे. उद्यानात जाण्यास नागरिकांना भिती वाटू लागली आहे. जवळपास एक वर्षापासून येथे गांजा व इतर अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांचा अड्डा तयार झाला आहे. अंमली पदार्थ विकणाऱ्यांनी महाविद्यालयीन मुलांसोबत सातवी व आठवीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अंमली पदार्थांच्या विळख्यात ओढले आहे. या परिसरातील रहिवाशांनी स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख समीर बागवान यांच्याकडे तक्रार केली होती.
लोकमतने अंमली पदार्थ विरोधात मोहीम सुरू केली असल्यामुळे त्यांनी या विषयी पोलीस आयुक्तांकडे पत्र पाठवून लोकमतलाही या प्रकाराविषयी माहिती दिली. रविवारी दुपारी उद्यानास भेट दिली असता तीन मुले स्पेब ७ चे सेवन करत असल्याचे निदर्शनास आले.
‘स्पेब ७ अॅडेसिव्ह’ हे फेव्हिकॉलप्रमाणे चिकट द्रव आहे. त्याचा वापर फर्निचर बनविणे, पीव्हीसी, फरशी, वाहन, लेदर व हस्तकलेच्या वस्तू बनविण्यासाठी केला जातो. अत्यंत उग्र वास येणारा या द्रवाचा वास घेतल्यास नशा येते.
उद्यानामध्ये अंमली पदार्थांचे सेवन सुरू असल्याविषयी माहिती बागवान यांनी एनआरआय पोलीस स्टेशनला फोन केला. पोलिसांनी घटनास्थळावरून सातवीतील दोन मुलांना ताब्यात घेतले. मुलांना व्यसनांच्या विळख्यात ढकलणारा रवी नावाचा १८ ते २० वर्षाच्या मुलाने तेथून पळ काढला.
स्पेब ७ विषयी माहिती घेतली असता, अंमलीपदार्थांच्या आहारी गेलेली व्यक्ती अंमली पदार्थ भेटत नसल्यास व किंमतही परवडत नसल्याने ४० रूपयांना मिळणाऱ्या स्पेब ७ चा उपयोग करीत असल्याचे उघड झाले. हे अत्यंत ज्वलनशील असून ते आगीपासून व लहान मुलांपासूनही दूर ठेवण्याची सूचना डब्यावर आहेत.
>अत्यंत घातक द्रव
स्पेब ७ या डब्यावर ते किती घातक आहे याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. याचा वास घेवू नये. अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे उष्णता आणि आगीपासून दुर ठेवण्यात यावे. लहान मुलांपासून हे दुर ठेवण्यात यावे. रिकामा डबा साठवुन ठेवू नये. खाद्यपदार्थांपासून दुर ठेवण्यात यावा अशा स्पष्ट सुचना दिल्या आहेत.
४० रुपयांमध्ये १०० मिली
स्पेब ७ हे सहज उपलब्ध होत आहे. हार्डवेअर व फर्नीचरच्या दुकानांमध्ये ४० रूपयांमध्ये १०० मिलीचा डबा उपलब्ध होत आहे. गांजा विकत घेताना पोलिस पकडण्याची शक्यता असते. परंतू स्पेब ७ जवळ वापरले तरी काहीही कारवाई होत नाही. यामुळे अंमली पदार्थांऐवजी त्याचा वापर केला जावू लागला आहे.