अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2015 12:31 AM2015-08-06T00:31:09+5:302015-08-06T07:45:14+5:30
पार्टी करण्याच्या बहाण्याने १६ वर्षीय मुलीला एका दुकानात नेऊन तिच्यावर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी मध्यरात्री चेंबूर येथे घडली
मुंबई : पार्टी करण्याच्या बहाण्याने १६ वर्षीय मुलीला एका दुकानात नेऊन तिच्यावर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी मध्यरात्री चेंबूर येथे घडली. टिळक नगर पोलिसांना याची माहिती मिळताच रात्री ३ वाजता छापा घालून पोलिसांनी सहा जणांना रंगेहाथ अटक केली आहे. पीडित मुलीवर सध्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चेंबूरच्या लाल डोंगर परिसरात पीडित मुलगी आई-वडिलांसोबत राहते. या परिसरात आरोपीदेखील राहत असून यातील दोन आरोपींसोबत या मुलीची अनेक दिवसांपासून मैत्री होती. मंगळवारी या सहाही आरोपींनी पार्टी करण्याचा बेत आखला. त्यानुसार त्यांनी या मुलीलादेखील पार्टीत सामील होण्यास सांगितले. मुलीने होकार देताच, या आरोपींनी अमर महल परिसरातील पेस्तम सागर येथे असलेल्या एका दुकानात पार्टी करण्याचे ठरवले. एका मैत्रिणीच्या घरी कार्यक्रम असल्याचे कारण आई-वडिलांना सांगून ही मुलगी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडली. त्यानंतर दोन मित्रांनी तिला पेस्तम सागर परिसरातील दुकानात नेले.
या ठिकाणी अगोदरच आणखी चौघे पार्टी करण्याच्या तयारीत होते. काही वेळातच तिघेही दुकानात पोहोचल्यानंतर त्यांनीही पार्टीला सुरुवात केली. त्यानंतर या आरोपींनी मुलीलादेखील मोठ्या प्रमाणात दारू पाजली. काही वेळातच मुलगी पूर्णपणे नशेत धुंद झाली. ही संधी साधत सहा आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपींचे हे कृत्य मध्यरात्री ३ वाजेपर्यंत सुरू होते. या वेळी एका रिक्षाचालकाची नजर या आरोपींवर पडली. दुकानाचे शटर उघडताना त्याने मुलीला आणि या आरोपींना एकत्र पाहिले.
तेव्हा टिळक नगर पोलीस ठाण्याचे काही अधिकारी या ठिकाणी रात्रीची गस्त घालत होते. रिक्षाचालकाने तत्काळ या पोलिसांना थांबवून दुकानात सुरू असलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानुसार गस्त घालणाऱ्या पोलिसांनी तत्काळ आणखी काही पोलिसांना बोलावून दुकानाबाहेर सापळा रचला. त्यानंतर पवन पगारे (२१), सिद्धार्थ शिलवन (२१), किरण निकाळजे (२३), विकास घेवाळ (२१), रवी पुमाले (२५) आणि सचिन सुकाळे (२३) या सहा आरोपींना रंगेहाथ ताब्यात घेतले. या वेळी पीडित मुलीसह सर्व जण नशेत धुंद होते. त्यानुसार आरोपींना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर या पीडित मुलीला पोलिसांनी उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. या सहाही आरोपींवर पोलिसांनी बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.