अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2017 02:17 AM2017-04-05T02:17:34+5:302017-04-05T02:17:34+5:30
अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देत, तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना चारकोप परिसरात घडली.
मुंबई : दुकानात भाजी खरेदीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देत, तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना चारकोप परिसरात घडली. मुलीच्या पोटात दुखत असल्याने, तिला कुपर रुग्णालयात दाखल केले. तेव्हा दीड महिन्यानंतर ही घटना उघडकीस आली असून, ती चार आठवड्यांची गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सोमवारी चारकोप पोलिसांनी पॉक्सो आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.
चारकोपर परिसरात १४ वर्षांची नेहा आई-वडिलांसोबत राहते. सोमवारी तिच्या पोटात दुखत असल्याने, आईने तिला स्थानिक डॉक्टरांकडे नेले. तेथील डॉक्टरांनी तिला सोनोग्राफी करण्यासाठी कुपर रुग्णालयात धाडले, तेव्हा नेहा चार आठवड्यांची गरोदर असल्याची माहिती समोर आल्याने कुटुंबीयांनाही धक्का बसला. रुग्णालयाने ही माहिती चारकोप पोलिसांना दिली. त्यानुसार, चारकोप पोलिसांनी नेहाचे घर गाठले. तिला विश्वासात घेऊन तिच्याकडे विचारपूस केली. तेव्हा तिने तिच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडली.
नेहाने दिलेल्या जबाबानुसार, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सायंकाळी ७च्या सुमारास आईने तिला भाजी आणण्यासाठी बाहेर पाठविले. भाजी खरेदीसाठी ती नेहमीच्या रस्त्याने निघाली. त्याच दरम्यान अंधाराचा फायदा घेत, दोन तरुणांनी नेहाला गुंगी आणणारा वास देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर, जवळच्या झुडपात नेऊन तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले. आपल्यासोबत घडलेल्या या प्रकारामुळे नेहा प्रचंड घाबरली होती. शुद्धीवर आल्यानंतर नेहाने घर गाठले, परंतु घडलेल्या प्रकाराबाबत तिने कोणालाही सांगितले नाही.
अखेर दीड महिन्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. सोमवारी चारकोप पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून दोन अनोळखी इसमांविरुद्ध पॉक्सो आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेत आहेत, तसेच अभिलेखावरील आरोपी, रोडरोमियो, गर्दुल्ले यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती एसीपी श्रीरंग नाडगौडा यांनी दिली. (प्रतिनिधी)
।चिमुरड्यांचा आक्रोश थांबणार कधी?
२० मार्च ते २६ मार्च या आठवड्यात तब्बल १० लैंगिक अत्याचाराच्या घटनांची नोंद झाली आहे, तर ३०२ मुलींचे अपहरण झाले असून, त्यापैकी १४६ गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या वर्षीच्या पहिल्या तीन महिन्यांच्या तुलनेत हा आकडा वाढलेला आहे. दिवसेंदिवस चिमुरड्यांवरील अत्याचारांचा आकडा वाढत आहेत.
83मुली गेल्या तीन महिन्यांत लैंगिक अत्याचाराच्या शिकार ठरल्या आहेत. यापैकी ७४ गुन्ह्यांची उकल झाली.