अल्पवयीन मुलीवर बलात्कार, सावत्र बापास पाच वर्षांचा कारावास
By admin | Published: November 7, 2016 04:41 PM2016-11-07T16:41:50+5:302016-11-07T16:41:50+5:30
अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एम. प्रधान यांनी पाच वर्षांच्या कारावासाची व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
ऑनलाइन लोकमत
वसई, दि. 7 - बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणार्या नराधम सावत्र बापाला वसई सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एम. प्रधान यांनी पाच वर्षांच्या कारावासाची व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास आरोपीस सहा महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.
नालासोपारा पूर्वेकडील अचोळे रोडवरील नाईकपाडा परिसरात राहणार्या १२ वर्षांच्या मुलीसोबत तिच्याच सावत्र वडिलांनी ७ मार्च २०१५ रोजी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी मुलीच्या आईने तुळींज पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी राकेश दीपनाथ खत्री याच्याविरुद्ध लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम कलम ८ व १२ तसेच कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लोंडे मॅडम यांनी आरोपीला अटक केली होती.
या प्रकरणाची सुनावणी वसई सत्र न्यायालयात सुरू होती. वसईचे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एम.प्रधान यांनी पोलिसांनी सादर केलेले साक्षी पुरावे, वैद्यकीय अहवाल, सरकारी व प्रतिपक्षाच्या वकिलांचे युक्तिवाद पडताळल्यानंतर आरोपी राकेश खत्री याला दोषी मानून पाच वर्षांच्या कारावासाची तसेच पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. खटल्यामध्ये सरकारी वकील उज्ज्वला मोहळकर यांनी युक्तिवाद सादर करुन आरोपीला शासन व पीडित मुलीला न्याय मिळवून दिला.