अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सहा महिन्यांनी घटना उघड
By Admin | Published: July 29, 2016 03:53 PM2016-07-29T15:53:37+5:302016-07-29T15:53:37+5:30
जिल्ह्यातील तळेगाव (श्यामजीपंत) येथे एका १६ वर्षीय तरुणीवर हातपाय बांधून तिच्यावर बळजबरी केल्याचा प्रकार सात महिन्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीवरून उघड झाला आहे.
तळेगाव येथील प्रकरण: पीडिता सात महिन्याची गर्भवती
वर्धा - जिल्ह्यातील तळेगाव (श्यामजीपंत) येथे एका १६ वर्षीय तरुणीवर हातपाय बांधून तिच्यावर बळजबरी केल्याचा प्रकार सात महिन्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीवरून उघड झाला आहे. या घटनेची नोंद सेवाग्राम पोलिसांनी केली असून प्रकरणाची माहिती तळेगाव (श्यामजीपंत) पोलिसांना देण्यात आली आहे. या प्रकरणाची माहिती घेण्याकरिता तळेगाव पोलीस सेवाग्राम पोलिसातून कागदपत्र घेत या प्रकरणी गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
पोलीस सुत्रांनीदिलेल्या माहितीनुसार, तळेगाव (श्यामजीपंत) पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या पारडी शिवारात एक १६ वर्षीय मुलगी शेतात एकटी असल्याचे पाहून अज्ञात इसमाने तिच्यावर बलात्कार केला. हे कृत्य करण्यापूर्वी आरोपीने मुलीच्या नाकाला रूमाल लावून तिला बेशुद्ध केले. जेव्हा पीडिता शुद्धीवर आली होती. तोपर्यंत सदर इसम तिथून पसार झाला होता. तिने ही बाब कुटुंबियांना सांगितली. मात्र त्यावेळी पोलिसात तक्रार देण्यात आली नसल्याचे तिच्या कुटुंबियांकडून पोलिसांना सांगण्यात आले आहे. ही घटना सुमारे सात महिन्यापूर्वी घडली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
सदर पीडितेला आई वडील नसल्याने ती तिच्या बहिणीकडे राहते. दरम्यान यानंतर २२ जुलैला सदर मुलीला चक्कर आल्याने ती पडली. त्यामुळे तीला उपचारार्थ सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी ती गर्भवती असल्याची बाब पुढे आली. याची प्राथमिक तक्रार सेवाग्राम पोलीसात देण्यात आली. या तक्रारीचे कागदपत्र तळेगाव पोलिसांना शुक्रवारी प्राप्त झाल्यानंतर अज्ञात इसमावर कलम ३७६, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून सरंक्षण कायद्यान्वये कलम ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास तळेगाव पोलीस करीत आहे.
सदर प्रकरणाची माहिती सहा महिन्यांनी मिळाल्याने याबाबत आता तक्रार नोंदविली आहे. पीडिता अल्पवयीन असल्याने बाल सरंक्षण समितीत याबाबत बयान नोंदवेल, घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्यात येईल.
- राजेंद्र कापसे, पोलीस उपनिरीक्षक, तळेगाव