पालघरमध्ये अल्पवयीन गरोदर मातेचा मृत्यू; पती, सासू, सासरे, आई-वडिलांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 10:04 AM2024-06-30T10:04:10+5:302024-06-30T10:05:18+5:30
उपचारादरम्यान अल्पवयीन आईसह पाच महिन्यांच्या अभर्काचाही मृत्यू झाला
लोकमत न्यूज नेटवर्क, मोखाडा : मोखाड्यातील अल्पवयीन गरोदर माता व तिच्या पाच महिन्यांच्या अर्भकाच्या मृत्यूप्रकरणी तिचा पती, तिचे आई-वडील, चुलते, सासू, सासरे यांच्यासह मंडपवाला, लग्न लावणारे भटजी, लग्नातील जेवण बनवणारे आचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोखाडा तालुक्यातील मोऱ्हांडा येथील मंगला जयेश निसाळ (वय १६) ही पाच महिन्यांची गर्भवती होती.
तिच्या छातीत व पोटात दुखू लागल्याने तिला मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचारादरम्यान तिच्यासह तिच्या पाच महिन्यांच्या अभर्काचाही मृत्यू झाला. ही घटना आठ जून रोजी घडली. सुरुवातीला हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला गेला. यामुळे प्रथमदर्शनी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली होती; परंतु तपासाअंती २२ जून रोजी तिचा पती जयेश रामदास निसाळ (२१) याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
मोखाडा तालुक्यात शिक्षणाचा फारसा प्रचार प्रसार झालेला नाही. आजही येथे एखादी शाळकरी विद्यार्थिनी शिक्षणात हुशार असली, पुढे जाऊन तिची एखादी अधिकारी बनण्याची इच्छा असली तरी तिचे शिक्षण अर्धवट थांबवून आई-वडील लहान वयात लग्न लावून देतात. या घडणाऱ्या घटना थांबायला हव्यात. लोकांमध्ये याबाबत जनजागृती व्हायला हवी. कायद्याची जरब बसावी यामुळे या घटनेत जे जे दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, कठोर कारवाई केली जाणार आहे. - प्रदीप गीते, सहायक पोलिस निरीक्षक, मोखाडा पोलिस ठाणे
बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई
त्याचबरोबर मृत मंगलाचे सासू, सासरे, आई-वडील, चुलते, तसेच लग्नातील मंडपवाला, लग्न लावणारे भटजी, जेवण बनवणारे आचारी यांच्यावरही बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.