अल्पवयीन असुरक्षितच!
By admin | Published: April 29, 2016 03:07 AM2016-04-29T03:07:33+5:302016-04-29T03:07:33+5:30
नागपाड्यातील अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
मुंबई : नागपाड्यातील अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुंबईतून दिवसाला २ ते ३ मुले बेपत्ता होत आहेत. गेल्या साडेतीन महिन्यांत तब्बल ३०७ मुली बेपत्ता झाल्या आहेत. तर तब्बल १३० मुली लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरल्या आहेत.
मुंबईत दिवसेंदिवस कामाच्या वाढत्या ताणामुळे पालक आणि मुलांमधील संवाद कमी होत आहे. सध्या शाळेला सुटी लागल्याने लहान मुले अधिकाधिक वेळ घराबाहेर असतात. त्यामुळे पालकांची जबाबदारी वाढली आहे. पाल्य अचानक बेपत्ता झाल्यानंतर इतरांना दोष देण्यापेक्षा आपली मुले कोणाबरोबर, किती वेळ आणि काय खेळतात, याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची असली तरी पालकांनीही या बाबींकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
शहरातून दिवसाला सरासरी दोन ते तीन मुले बेपत्ता होत आहेत. यंदा पहिल्या साडेतीन महिन्यांत तब्बल ३०७ मुली बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस दफ्तरी आहे. पैकी अवघ्या १५४ मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले. त्यापैकी १२० गुन्ह्यांची उकल करण्यात आली. त्याच तुलनेत २०१५ मध्ये पहिल्या साडेतीन महिन्यांत २३८ मुली बेपत्ता झाल्या होत्या. तर १२१ मुली लैंगिक अत्याचाराला बळी पडल्या होत्या. (प्रतिनिधी)
>प्रमाण अधिक असलेले परिसर
भांडुप, चेंबूर, गोवंडी, घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, मालाड, कांदिवली, दहिसर अशा झोपडपट्टी विभागांत बालकांवर अत्याचारांचे प्रमाण अधिक आहे.
बेपत्ता होण्यामागची कारणे
१४ ते १८ वर्षे वयोगटातील काही मुले आपल्या मर्जीने घर सोडतात, तर काही प्रेमप्रकरणामुळे पळून जातात.
काही मुलांचे खंडणीसाठी अपहरण होते.
जन्माला आल्यापासून आठ किंवा दहा वर्षे वयोगटातील मुलांचे लैंगिक शोषणासाठीही अपहरण होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
मूल न होणाऱ्या दाम्पत्यांना अवैध विक्रीसाठी, परदेशात पाठवण्यासाठी, भीक मागणाऱ्या टोळीत सहभागी करून घेण्यासाठी या चिमुरड्यांचे अपहरण होत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.