काँग्रेसकडून अल्पसंख्याक जोडो अभियान
By admin | Published: November 19, 2016 03:26 AM2016-11-19T03:26:24+5:302016-11-19T03:26:24+5:30
पालघर जिल्हातील दुरावलेले अल्पसंख्याक व मुस्लिम समाजाला पुन्हा काँग्रेस पक्षाशी जोडण्यासाठी खासदार हुसेन दलवाई यांच्या अध्यक्षतेखाली टेन मनोर येथील सायलेंट रिसॉर्ट येथे सभा घेण्यात आली
मनोर/पालघर : पालघर जिल्हातील दुरावलेले अल्पसंख्याक व मुस्लिम समाजाला पुन्हा काँग्रेस पक्षाशी जोडण्यासाठी खासदार हुसेन दलवाई यांच्या अध्यक्षतेखाली टेन मनोर येथील सायलेंट रिसॉर्ट येथे सभा घेण्यात आली. त्यावेळी पालघर जिल्हयाचे आठ तालुक्यातील ख्रिश्चन, पंजाबी, गुजराती, दलित, मुस्लिम व इतर समाजातील अल्पसंख्याक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महिलांची संख्या लक्षणिय होती. सभेचे आयोजन अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष मुस्तफा मेमन व तालुका अध्यक्ष असिफ मेमन यांनी केले होते.
अल्पसंख्याकांना संबोधित करतांना खासदार हुसेन दलवाई म्हणाले की, कॉग्रेस शिवाय पर्याय नाही म्हणू आपण मतभेद सोडून पुन्हा कार्याला सुरवात करा व पक्ष बळकट बनवा. ज्या अल्पसंख्याक समजाला त्यांचे हक्क मिळाले नाही ते सत्तेवर आल्यावर प्रथम प्राधान्य देऊन मिळवून देऊ असे आश्वासन दिले. या वेळी डहाणूचे नगरसेवक नदिम शेख यांनी पक्षातील ज्येष्ठ नेते कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करीत असल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीकडून कॉँग्रस भवनाचा ताबा घेतला गेल्याचा विषय एैरणीवर आणला. यावेळी बहुजन विकास,राष्ट्रवादी कॉग्रेसच्या तरु ण कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दनान धांगे हे म्हणाले की, आज अल्पसंख्यांक मुस्लिम समाजासाठी महाविद्यालय नाही उर्दू शाळेमध्ये शिक्षक नाही. असे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. शमीम शेख यांनी आपल्या भाषणात मुलींना शाळा, महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळत नाही, सरकारी नोकऱ्यांपासून समाज दुरावलेला आहे, शासकीय कार्यालयात गेले तर कामे होत नाही, पोलीस ठाण्यात न्याय मिळत नाही असे अनेक प्रश्न मांडले. यावेळी माजी मंत्री राजेंद्र गावित, जिल्हा अध्यक्ष मनीष गणवरे , महिला अध्यक्ष शमीम शेख उपस्थिती होते. (वार्ताहर)
>मुस्लिम तरुणीची धाडसी कैफियत
कार्यक्रम सुरु असतांना पुरुष मंडळींनी समाजाचे प्रतिनिधीत्व करुन समस्या मांडत असतांनाच अचानक मुस्लिम समाजातील एक तरु णी आयशा मेमन हिने व्यासपीठावर येऊन माईकचा ताबा घेतला. ती धाडसाने बोलली की, मुस्लिम समाजाच्या मुलींना शिक्षणासाठी पुढे यायला पाहिजे. आधुनिक शिक्षण घेण्यासाठी मुलींना संघर्ष करावा लागतो. तसे न करण्यासाठी घरातून व समाजातून अनेक बंधने लादली जातात. मुस्लिम समाजातील स्त्री जिवन सुधारण्यासाठी त्यांना शिक्षण व सरकारी नोकरी हाच एक मार्ग असल्याने तिने ठामपणे सांगितले.