अल्पसंख्यकांना आरक्षण हा उपाय नाही : हेपतुल्ला
By admin | Published: January 4, 2015 02:09 AM2015-01-04T02:09:36+5:302015-01-04T02:09:36+5:30
मुस्लिम समाजासह अन्य अल्पसंख्यकांना आरक्षण दिल्याने त्यांच्या बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही,
मुंबई : मुस्लिम समाजासह अन्य अल्पसंख्यकांना आरक्षण दिल्याने त्यांच्या बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही, तर त्यांना स्वयंरोजगार करता यावा यासाठी कौशल्य विकास करणे आवश्यक असल्याचे मत केंद्रीय अल्पसंख्यांक विकास मंत्री नजमा हेपतुल्ला यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
कौशल्य विकासाच्या दृष्टीने राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळ (एनएमडीएफसी) तसेच मौलाना आझाद राष्ट्रीय कौशल्य अकादमीच्या वतीने देशभर मोठ्या प्रमाणात कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि गुवाहाटी येथे एनएमडीएफसीची क्षेत्रीय कार्यालये उघडली जाणार आहेत. मुंबईतील कार्यालयामार्फत महाराष्ट्र आणि गुजरातमधील कौशल्य विकासाचे कार्यक्रम राबविले जातील. त्यासाठी ‘मानस’ उपक्रमांतर्गत ३१ मार्चपर्यंत १० हजार युवकांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)