अल्पसंख्यांक सुरक्षा महासंघाच्या उपाध्यक्षाला घरफोडीप्रकरणी अटक
By admin | Published: March 15, 2017 08:32 PM2017-03-15T20:32:35+5:302017-03-15T20:32:35+5:30
भारतीय अल्पसंख्यांक सुरक्षा महासंघाच्या राज्य उपाध्यक्षाला गुन्हे शाखेने घरफोडीचे गुन्हे केल्याप्रकरणी अटक केली
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 15 - भारतीय अल्पसंख्यांक सुरक्षा महासंघाच्या राज्य उपाध्यक्षाला गुन्हे शाखेने घरफोडीचे गुन्हे केल्याप्रकरणी अटक केली असून त्याच्याकडून तब्बल 15 लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे स्वत:च्या अल्पवयीन मुलाला तो घरफोड्या करायला लावीत होता. तपासासाठी पोलीस त्याच्याकडे गेल्यास पदाचा धाक दाखवत त्यांच्याविरुद्ध तक्रारी करीत असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यास कोणी धजावत नव्हते. युनिट चारच्या पथकाने त्याच्यासह पत्नी आणि मुलालाही गजाआड केल्याची माहिती प्रभारी अतिरीक्त आयुक्त दीपक साकोरे यांनी दिली.
नानाभाऊ शंकर लंके (वय 40, रा. अनिरुद्ध अपार्टमेंट, कस्तुरबा सोसायटी, विश्रांतवाडी) असे त्याचे नाव आहे. त्याची पत्नी दीपाली हिच्यासह 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लंकेकडून 20 तोळे सोन्याचे दागिने, सहा लॅपटॉप, 13 घड्याळे, सात कॅ मेरे, 15 मोबाईल, तीन टॅब, शिलाई मशीन, दुर्बीण हस्तगत करण्यात आली असून त्याची मोटार व एक गावठी कट्टाही जप्त करण्यात आला आहे. त्याने स्वत:च्या अल्पवयीन मुलाकडून विश्रांतवाडी आणि खडकी परीसरात घरफोड्या करुन घेतल्या. चोरीमध्ये मिळालेला मुद्देमाल घेऊन पत्नी दिपालीच्या मदतीने अटक करण्यात आलेला सराफ प्रविण देवराज पारेख (वय 53, रा. भाग्यश्री फॅशन, कुंदन कॉर्नर, खडकी बाजार) याला विकत असत.
लंके याच्याकडे घरफोडीतील ऐवज असल्याची माहिती सहायक निरीक्षक नितीन भोयर यांना मिळाली होती. परंतु, तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तपासासाठी पोलीस गेल्यास पदाचा धाक दाखवत पुराव्यांची तसेच सर्च वॉरंटी मागणी करुन दबाव टाकत असे. यासोबतच पोलिसांविरुद्ध खोटे अर्ज करीत असल्याने स्थानिक पोलीस कारवाईला धजावत नव्हते. गुन्हे शाखेने ही परिस्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. न्यायालयाने दिलेले सर्च वॉरंट घेऊन त्याच्या घराची झडती घेण्यात आली. त्यावेळी घरामध्ये लॅपटॉप, मोबाईल, घड्याळ, कॅमेरे आदी साहित्य मिळून आले. चौकशीदरम्यान त्याने पोलिसांना उत्तरे न देता उच्च न्यायालयात बघून घेण्याची धमकी दिली. त्याला अटक करुन न्यायालयामधून दहा दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली. आरोपीच्या मोटारीची झडती घेतली असता त्यामध्ये कॅमेरा, मोबाईल, लॅपटॉप तसेच एका गावठी कट्ट्यासह अन्य साहित्य मिळून आले. गावठी कट्ट्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई प्रभारी अतिरीक्त आयुक्त तथा उपायुक्त दीपक साकोरे, सहायक आयुक्त अरुण वालतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र तोडकर, सहायक निरीक्षक नितीन भोयर, गणेश पाटील, उपनिरीक्षक विलास पालांडे यांच्या पथकाने केली.
आरोपी लंके चोरीचा ऐवज पत्नी दिपालीकडे देत होता. दिपालीसह मिळून हे दागिने सराफ प्रवीण देवराज पारेख याच्याकडे देत असत. पारेख जुने दागिने मोडून त्या सोन्यापासून त्यांना नविन दागिने बनवून देत असे. त्याबदल्यात त्याला 25 टक्के कमिशन मिळत होते. नविन दागिने मुथ्थुट फायनान्स व मणप्पुरम फायनान्समध्ये तारण ठेवून त्याद्वारे आरोपींनी लाखोंचे कर्ज घेतले. पोलिसांनी हे सर्व दागिने जप्त केले आहेत. आरोपींकडून आणखीही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्याने काही बँकाकडून कर्ज घेतलेले असून हे कर्ज त्याने थकवलेले आहे. बँकेच्या अधिका-यांनाही त्याने पदाचा धाक दाखवल्याने हे अधिकारी त्याच्याकडे वसुलीसाठी जातच नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने राहत्या इमारतीमधील ब-याच सदनिका बळकावल्या असून इमारतीचा ताबा घेतल्याचेही उपायुक्त साकोरे यांनी सांगितले.
नानाभाऊ लंके याने 2012 साली एका महिलेला तो भारतीय अल्पसंख्यांक सुरक्षा महासंघाचा अध्यक्ष असल्याची बतावणी करीत मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांशी ओळख असल्याचे सांगितले होते. या महिलेला बढती मिळवून देण्याचे आमिष दाखवत पत्नीच्या मदतीने तिच्याकडून तीन लाख रुपये उकळले होते. त्यानंतर एक लाख रुपये घेऊन तिचे मोबाईलवर फोटो काढून धमकावत पत्नीच्या मदतीने बलात्कार केला होता. यासंदर्भात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.