अल्पसंख्याक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून दूरच : खासदार हुसेन दलवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 03:23 AM2018-01-08T03:23:47+5:302018-01-08T03:25:05+5:30
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. शिष्यवृत्तीअभावी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिक्षणात विविध अडथळे येतात.
मुंबई : अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. शिष्यवृत्तीअभावी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिक्षणात विविध अडथळे येतात. याबाबतची असंख्य प्रकरणे समोर आल्याचे खासदार हुसेन दलवाई यांनी सांगितले. रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील अंजूमन-ए-इस्लाम महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. या वेळी मौलाना आझाद विचार मंचाचे उपाध्यक्ष करीम सालार आणि सच्चर कमिटीचे माजी सदस्य सचिव अबू सालेह शरीफ यांची उपस्थिती होती.
दलवाई पुढे म्हणाले की, अल्पसंख्य समाजांमधील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शासनाच्या शिष्यवृत्तींची अत्यंत गरज असते. शासनाने या विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्ती पोहोचविण्यासाठी सुविधा पुरवणे आवश्यक आहे. यासंबंधीची कार्यवाहीदेखील किचकट असल्याने शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात अनंत अडथळे येतात. त्यामुळे संपूर्ण कार्यवाही आॅनलाइन व्हावी, यासाठी पाठपुरावा आता करणार आहोत.
...म्हणून मुस्लिमांमध्ये बालकामगार-
आर्थिकदृष्ट्या दुर्बलतेमुळे अधिकांश मुस्लीम विद्यार्थी शिक्षणापसून वंचित राहतात. त्यामुळे मुस्लिमांमध्ये बाल कामगारांचे प्रमाण अधिक असल्याचे मत दलवाई यांनी मांडले. तसेच ओबीसीमध्ये मुस्लिमांना स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी मागणी दलवाई यांनी या वेळी मांडली.
आर्थिकदृष्ट्या उच्चवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मुस्लीम अशा तीन प्रकारांमध्ये ओबीसी आरक्षणाची विभागणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी या वेळी मांडली.
तसेच अल्पसंख्याकांसाठी असलेल्या विविध निधी, शिष्यवृत्त्यांबाबत लोकांमध्ये प्रबोधन व्हावे, यासाठी मौलाना आझाद विचार मंचाचे राज्यभरातील कार्यकर्ते सर्वत्र जनजागृती करणार असल्याचेही दलवाई यांनी सांगितले.