कोरोना काळातही मीरा-भाईंदरमधून महसूल विभागाने केली आता पर्यंतची विक्रमी कर वसुली 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 12:00 PM2021-04-11T12:00:34+5:302021-04-11T12:05:36+5:30

८ कोटी ६५ लाख रुपये इतका महसुली कर झाला जमा 

mira bhayandar more tax collection this year in coronavirus conditions people supporting | कोरोना काळातही मीरा-भाईंदरमधून महसूल विभागाने केली आता पर्यंतची विक्रमी कर वसुली 

कोरोना काळातही मीरा-भाईंदरमधून महसूल विभागाने केली आता पर्यंतची विक्रमी कर वसुली 

googlenewsNext
ठळक मुद्दे८ कोटी ६५ लाख रुपये इतका महसुली कर झाला जमा कोरोना काळातही झाली विक्रमी करवसूली

मीरारोड - मीरा भाईंदर अपर तहसीलदार कार्यालयाच्या अखत्यारीतील मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयाने मीरा भाईंदर शहरातून महसुली कर वसुलीचा आतापर्यंतचा उच्चांक नोंदवला आहे. कोरोना संसर्ग काळात आर्थिक स्थिती अडचणीची असताना सुद्धा करदात्यांनी महसूल विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ८ कोटी ६५ लाख ७४ हजार रुपये इतका विक्रमी कर भरणा केला. 

मीरा भाईंदर मध्ये २०१९ साली स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालय अस्तित्वात आल्या नंतर अपर तहसीलदार म्हणून नंदकिशोर देशमुख यांची नियुक्ती केली गेली. तहसीलदार कार्यालय आधी भाईंदरच्या ९० फुटी मार्गावर चक्क लिफ्ट नसलेल्या दुसऱ्या मजल्यावर अतिशय दाटीवाटीच्या ठिकाणी पालिकेने दिले होते. ता नंतर ते चक्क कनकियाच्या टोकाला एका बाजूस नेण्याचा घाट घालण्यात आला होता. 

परंतु लोकमतने या बाबत आवाज उठवल्या नंतर तहसीलदार कार्यालय शहराच्या मध्यवर्ती भाईंदरच्या मॅक्सस मॉल मागील पालिका इमारतीत सुरु करण्यात आले. यामुळे शहरातील नागरिकांना सदर कार्यालय सोयीच्या ठिकाणी होऊन दिलासा मिळाला आहे. नागरिकांना आता ठाण्याला खेपा माराव्या लागत नाहीत. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मंडळ अधिकारी प्रशांत कापडे, तलाठी अनिता पाडवी, नितीन पिंगळे, अभिजित बोडके, वंदना आव्हाड, रमेश फाफाळे व कराचार्यानी २०२०-२०२१ ह्या आर्थिक वर्षात आता पर्यंतची सर्वात जास्त महसुली कर वसुली केली आहे. 

विक्रमी करवसूली

मीरा भाईंदर शहरातून इतकी वर्ष कधी  महसुली उत्पन्न शासना कडे जमा झाले नव्हते. परंतु देशमुख यांच्या मार्गदर्शन व नियोजन खाली मंडळ अधिकारी, तलाठी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्या मुळे कोरोनाच्या संसर्ग काळात सुद्धा करदात्यांनी तब्बल ८ कोटी ६५ लाख ७४ हजार रुपये इतका महसुली कर भरला आहे. त्यामध्ये ६ कोटी २१ लाख ६८ हजार हे जमीन महसुली कराचे, तर २ कोटी ४४ लाख ६ हजार रुपये गौणखनिज चे उत्पन्न जमा झाले आहे. 

२०१९ - २०२० सालात सुद्धा अपर तहसीलदार कार्यालयाने ४ कोटी ३० लाख ७८ हजार रुपये इतका कर शासनास वसूल करून दिला होता . परंतु जेव्हा अपर तहसीलदार कार्यालय नव्हते त्यावेळी मात्र फारशी कर वसुली झाली नसल्याचे गेल्या तीन - चार वर्षाच्या आकडेवारी वरून दिसुन येते. मीरा-भाईंदर साठी स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालय व्हायच्या आधी सन २०१८ - २०१९ या आर्थिक वर्षात जमीन महसूल व गौणखनिज मिळून १ कोटी ५८ लाख ६४ हजार रुपये तर सन २०१७ - २०१८ साली फक्त जमीन महसूल कर १ कोटी १५ लाख रुपये इतकाच वसूल झाला होता . 

मीरा भाईंदरच्या जागरूक करदात्या नागरिकांनी यंदा महसूल विभागाच्या आवाहनास चांगला प्रतिसाद देऊन कर भरणा केला आहे. मंडळ अधिकारी, तलाठी व कर्मचाऱ्यांनीसुद्धा कर भरण्यासाठी पाठपुरावा केला. हा कर शासकीय सुविधा व योजनां मार्फत जनतेसाठी खर्च होत असतो. नागरिकांनी नियमित कर भरून सहकार्य करावे.

नंदकिशोर देशमुख (अपर तहसीलदार) 
 

Web Title: mira bhayandar more tax collection this year in coronavirus conditions people supporting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.