मीरा-भार्इंदर मनपा निवडणूक : BJPची पहिली उमेदवार यादी आज होणार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 09:52 AM2017-07-31T09:52:28+5:302017-07-31T10:26:40+5:30
मीरा भार्इंदर महापालिका निवडणुकीसाठीची विविध सर्वेक्षणांच्या अहवालानंतर निश्चित केलेल्या भाजपाच्या ६८ उमेदवारांची यादी मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आली आहे. त्यांनी हिरवा कंदिल दिलेल्या उमेदवारांची पहिली यादी सोमवारी जाहिर केली जाणार आहे.
मीरारोड, दि. 31 - मीरा भार्इंदर महापालिका निवडणुकीसाठीची विविध सर्वेक्षणांच्या अहवालानंतर निश्चित केलेल्या भाजपाच्या ६८ उमेदवारांची यादी मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आली आहे. त्यांनी हिरवा कंदिल दिलेल्या उमेदवारांची पहिली यादी सोमवारी (31 जुलै) जाहिर केली जाणार आहे. पण यादी जाहीर होण्याआधीच निश्चित उमेदवारांचे अर्ज भाजपाने भरण्यास घेतले आहेत. त्यांच्या उमेदवारांच्या यादीवर आमदार नरेंद्र मेहता यांची छाप असून काही ज्येष्ठ व विद्यमान नगरसेवकांची नावं पहिल्या यादीत नसल्याने त्यांना धक्का देण्याची शक्यता आहे.
मीरा भार्इंदर महापालिका निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपाकडे २६७ इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज भरले होते. ही यादी पाठवण्यात आली आहे. मीरा भार्इंदर महापालिका निवडणूक भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार हे पक्ष नेत्यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. स्थानिक भाजपा संघटना व नगरसेवकांवर आमदार मेहतांची पकड सर्वश्रूत आहे.
महापौर गीता जैन यांच्यासह पक्षातील काही ज्येष्ठ व जुन्या कार्यकर्त्यांशी आमदार मेहतांचे पटत नसल्याने त्यांना विविध ठिकाणी डावलणे तसेच त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न सातत्याने होत असल्याची नाराजी पक्षांतर्गत होत आली आहे. ज्येष्ठांनी देखील भाजपात चाललेली खोगीर भरती, मनमानी कार्यपद्धती आदींवरुन टिकेची झोड उठवली होती.
यंदाच्या महापालिका निवडणुकीत देखील विरोधकांचे पत्ते कापण्यासह गरजे समयी पक्षात घेताना दिलेली उमेदवारीची आश्वासने तसेच नव्याने पक्षात घेतलेल्यांना उमेदवारी तर जुन्यांना डालवण्याचे प्रकार होणार असे संकेत 'लोकमत'ने आधीच दिले होते. नगरसेविका दिप्ती भट, सुमन कोठारी, सुजाता शिंदे सह माजी नगरसेवक रजनीकांत व सरस्वती मयेकर, स्नेहा पांडे सह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपा सोडून शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यांचा रोषदेखील भाजपा नव्हे तर आमदार मेहतांवर होता.
या शिवाय प्रभाग क्र. २०, ५, ३, १४, ६ आदी ठिकाणी देखील विद्यमान नगरसेवकांचा पत्ता कापला जाणार हे स्पष्ट असुन अन्य काही प्रभागां मध्ये देखील इच्छुकांची मोठी संख्या पाहता बंडखोरीची भिती आहे. त्यामुळे भाजपाने सावध पावित्रा घेतला असुन बंडखोरी टाळण्यासाठी वादग्रस्त प्रभागातील जागा शेवटच्या क्षणि जाहिर खेली जाण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यां कडे पाठवलेल्या ६८ जणांच्या यादी पैकी ते किती नावांवर शिक्कामोर्तब करतात या कडे देखील अनेकांचे लक्ष लागले आहे. प्रभाग क्र. ५ मधुन मुन्ना सिंह व वंदना पाटील यांना अर्ज भरण्यास सांगण्यात आला असताना ५ वेळा निवडणुन आलेले ज्येष्ठ नगरसेवक शरद पाटील व दोन वेळा निवडुन आलेल्या वर्षा भानुशाली यांच्या वर मात्र टांगती तलवार ठेवली आहे.
प्रभाग २ मधुन ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगण्यात आले असले तरी त्यांच्या कन्या तथा दोन वेळा नगरसेविका झालेल्या कल्पना म्हात्रे यांच्यासाठी मात्र लाल बावटा फडकवला आहे. येणारे महापौर पद हे इत्तर मागासवर्गिय महिले साठी राखीव असुन आ. मेहतांच्या वहिनी डिंपल ह्यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे कल्पना यांचा अडसर दूर करण्यासाठी त्यांचा पत्ता कापण्याची शक्यता आहे.
प्रभाग क्र. २० मधुन अश्विन कासोदरीया, हेतल परमार , नया वसाणी यांचे नांव नक्की झाल्याचे सांगीतले जात असले तरी सेनेतुन आलेले प्रशांत दळवी की भाजपा नगरसेवक दिनेश जैन पैकी कोणाची उमेदवारी कापली जाणार ? याची चर्चा आहे. नगरसेविका सीमा शाह यांच्या उमेदवारी बद्दल देखील साशंकता आहे.
प्रभाग क्र. १४ मधुन भाजपा नगरसेवक अनिल भोसले की नगरसेविका मीरा देवी यादव ? अशी डोकेदुखी भाजपा नेतृत्वाला असली तरी भोसले यांना डालवण्यात येणाची शक्यता आहे. प्रभाग क्र. ४ मध्ये देखील गणेश गजानन भोईर, मधुसुदन पुरोहित आदीं पैकी कोणाची गच्छंती होणार याची चर्चा रंगली आहे. या शिवाय आणखी काही प्रभागां मध्ये देखील इच्छुकांची संख्या पाहता चुरस आहे.
बंडखोरांना शांत करण्यासाठी पुन्हा काही प्रभागां मध्ये फेरसर्वेक्षण हाती घेण्यात आल्याचे कारण सांगीतले जात आहे. भाजपाच्या उद्या सोमवारी जाहिर होणारया पहिल्या यादी कडे इच्छुक व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.