निवडणुकांमुळेच मीरा-भार्इंदर मेट्रोला मंजुरी
By Admin | Published: April 4, 2017 04:07 AM2017-04-04T04:07:10+5:302017-04-04T04:07:10+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीरा-भार्इंदर मेट्रोला दिलेली मंजुरी केवळ महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केली आहे.
भार्इंदर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीरा-भार्इंदर मेट्रोला दिलेली मंजुरी केवळ महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केली आहे. नागरिकांना खरोखरीच मेट्रोची सुविधा मनापासून द्यायची असती, तर भाजपा सरकारने मीरा-भार्इंदर मेट्रो ही अंधेरी-दहिसर पूर्व मेट्रोलाच जोडून त्यासाठी दोन हजार कोटींची तरतूद करायला हवी होती, अशी टीका काँग्रेसचे माजी आमदार मुजफ्फर हुसेन यांनी केली.
२००९-१० साली महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान राबविण्यात आले होते. त्याचबरोबर तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारच्या सहकार्याने जपानच्या जेआयसीए संस्थेमार्फत कर्ज उपलब्ध करुन मेट्रो प्रकल्पाला चालना देण्यात आली. सध्या सुरु असलेल्या सर्वच मेट्रो प्रकल्पांना याच जपानी कंपनीमार्फत निधी मिळत आहे, याचा दाखला देत त्यांनी मेट्रो प्रकल्पांचे श्रेय भाजपाचे नाही. ते लाटण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याकडे बोट दाखवले.
विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मी २००६ साली त्यांना मीरा-भार्इंदरसाठी, रस्ते, पाणीपुरवठा आदी विविध योजना तयार करण्याचे पत्र दिले होते. त्यात मेट्रोचासुध्दा समावेश होता. एमएमआरडीएनेही त्यांच्या वाहतुकीसाठीच्या २००८-०९ च्या आराखड्यात दहिसरपासून मीरा-भार्इंदर व पुढे वसई-विरार असा मेट्रो मार्ग प्रस्तावित केला होता. उलट भाजपा सरकारने मीरा-भार्इंदरला मेट्रोतून वगळल्याने काँग्रेससह नागरिकांच्या संघटनेने आंदोलने केली होती, याचा दाखलाही त्यांनी दिला आणि आता केलेली घोषणा फसवी, दिखाऊ असल्याची टीका केली.
आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी आता मेट्रोच्या मंजुरीची घोषणा केली आहे. पण केवळ घोषणा करून व नारळ फोडून चालणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष तरतुदीची गरज आहे. मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निवडणुका आॅगस्टमध्ये होत असल्याने नागरिकांना भुलविण्यासाठी भाजपाने केवळ मेट्रोचे गाजर दाखवू नये. अंधेरी-दहिसर पूर्व या मेट्रोच्या मंजुर टप्प्यालाच मीरा-भार्इंदर मेट्रो जोडून लगेचच त्याचे काम सुरू करावे, असे हुसेन यांनी सुचवले. या कामासाठी सरकारने निधीची तरतुदच केलेली नाही. राज्य सरकारने याच वर्षात दोन हजार कोटी मेट्रोसाठी द्यावेत. त्यातून ते या प्रकल्पासाठी किती गंभीर आहेत, ते नागरिकांना समजले. अन्यथा नंतर निधीच मिळाला नाही किंवा तो तुटपुंजा दिला, तर मेट्रोच्या मंजुरीचा निर्णय केवळ पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतला, असे दिसून येईल आणि त्यांचे पितळ उघडे पडेल, अशी टीकाही त्यांनी केली. (प्रतिनिधी)
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निवडणुका आॅगस्टमध्ये होत असल्याने नागरिकांना भुलविण्यासाठी भाजपाने केवळ मेट्रोचे गाजर दाखवू नये. अंधेरी-दहिसर पूर्व या मेट्रोच्या मंजुर टप्प्यालाच मीरा-भार्इंदर मेट्रो जोडून लगेचच त्याचे काम सुरू करावे, असे हुसेन यांनी सुचवले. या कामासाठी सरकारने निधीची तरतुदच केलेली नाही. राज्य सरकारने याच वर्षात दोन हजार कोटी मेट्रोसाठी द्यावेत. त्यातून ते या प्रकल्पासाठी किती गंभीर आहेत, ते नागरिकांना समजले. अन्यथा नंतर निधीच मिळाला नाही किंवा तो तुटपुंजा दिला, तर मेट्रोच्या मंजुरीचा निर्णय केवळ पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतला, असे दिसून येईल आणि त्यांचे पितळ उघडे पडेल, अशी टीकाही त्यांनी केली.